पालकमंत्र्यांसह आमदारांवर बंडोबांना शांत करण्याची जबाबदारी

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी घातलेला वाडय़ावरील गोंधळ आणि मोठय़ा प्रमाणात झालेली बंडखोरी बघता त्यांना शांत करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत वाडय़ावर तडकाफडकी बैठक घेण्यात आली. या बैठकीत भाजपच्या या ‘डॅमेज कंट्रोल’ची जबाबदारी पालकमंत्र्यांसह आमदारांना देण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ज्या कार्यकर्त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली नाही, अशा नाराजांनी घोषणा देऊन वाडय़ावर गोंधळ घातल्याने शुक्रवारी गडकरी वाडा चांगलाच गाजला आणि त्याची देशभर चर्चा झाली. शहरात दोन सत्ता केंद्र असताना पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वाडय़ाचे महत्त्व वाढले. शुक्रवारी अंतिम यादी जाहीर करून नितीन गडकरी तात्काळ दुपारी दिल्लीला रवाना झाले. मात्र, शुक्रवारी झालेला वाडय़ावरील महिला कार्यकत्यार्ंचा आणि संघाच्या स्वयंसेवकांचा गोंधळ आणि पक्षातील बंडखोरांची मोठय़ा प्रमाणात संख्या बघता नितीन गडकरी दुसऱ्याच दिवशी नागपुरात आले आणि त्यांनी तात्काळ शहरातील आमदार, संसदीय मंडळ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व नाराज झालेल्या आणि ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला अशा कार्यकर्त्यांचा आढावा घेऊन त्यांना शांत करून त्यांची समजूत काढण्याबाबत चर्चा झाली. भाजपच्या या डॅमेजचा कंट्रोलचा निवडणुकीवर परिणाम होऊ नये आणि अंतर्गत वादामुळे पक्षातील उमेदवारांचा पराभव होऊ नये म्हणून या नाराज झालेल्या बंडोबांना शांत करण्याची जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत शहरातील सहा आमदारांना देण्यात आले आहे.

दरम्यान, प्रचाराच्या दृष्टीने व्यूहरचना ठरविण्या संदर्भात गडकरी यांनी प्रचार व प्रसार समितीची बैठक आयोजित करण्याच्या सूचना केल्या. ज्या उमेदवारांनी  नामांकन अर्ज भरले त्यात काही त्रुटी आहेत का यासंबंधी आढावा घेण्यात आला.

८ फेब्रुवारीला भाजप उमेदवारांची बैठक

येत्या तीन चार दिवसात सर्व बंडोबांना शांत करण्यात आल्यानंतर ८ फेब्रुवारीला सर्व उमेदवारांची बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत सर्व उमेदवारांना प्रचाराच्या दृष्टीने सूचना देण्यात येणार आहेत.