02 March 2021

News Flash

भाजपने मुंबईसाठी विधान परिषदेत नागपूरला डावलले!

कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर मुंबई महापालिकेवर झेंडा फडकण्याचा भाजपचा विचार आहे.

 

उपऱ्यांना संधी दिल्याने निष्ठावान कार्यकर्ते अस्वस्थ

शिवसेनेसाठी मुंबई जेवढी महत्त्वाची, तेवढीच भाजपसाठी नागपूर महापालिका महत्त्वाची आहे. यामुळे संघ मुख्यालय असलेल्या नागपूरची सत्ता हातात ठेवून मुंबई सर करण्याचे प्रयत्न होणे अपेक्षित आहे. परंतु अलीकडे घडत असलेल्या राजकीय घडामोडीवरून भाजप नागपूरकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. विधान परिषदेची निवडणूक हे त्याचे ताजे उदाहरण आहे. मंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विधान परिषदेत उमेदवार देण्यात आले आणि नागपूरला डावलण्यात आले.

गेल्या दहा वर्षांपासून नागपूर महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला नागपुरात पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करताना स्थानिक कार्यकर्त्यांना विधान परिषदेत संधी मिळणे अपेक्षित होते. परंतु भाजपने नागपूरच्या तुलनेत मुंबईवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून उपऱ्यांना संधी देऊन भाजप काँग्रेसच्या वाटेवर असल्याची टीका होत आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी देखील सुरू झाली. शहर कार्यकारिणी घोषित करून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय स्थानिक कार्यकर्त्यांना विधान परिषदेत पाठवून कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश दिला होता. पण, भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवार मुंबई महापालिकेवर डोळा ठेवून जाहीर केले.

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेकडून मुंबई महापालिका हिसकावून मुंबई आणि राज्यातही शक्तिशाली होण्याचे रणनीती भाजपची आहे. त्यामुळे भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभावी ठरू शकतील असा अंदाज बांधून सुरजीतसिंग ठाकूर, प्रवीण दरेकर आणि आर.एन. सिंग यांना उमेदवारी दिली आहे. आर. एन. सिंग हे तर काँग्रेसमधून ऐनवेळी भाजपमध्ये आले आहेत. प्रवीण दरेकर मनसेतून आले होते. या दोघांच्याही उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांनी नापसंती व्यक्त केली आहे.  नागपूर महापालिकेच्या निवडणुकीआधी शहरातील कार्यकर्त्यांना विधान परिषदेत पाठवले असते तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असता, परंतु नागपूर महापालिका निवडणुकीला पक्षाने गांभीर्याने घेतले नाही. नागपूर महापालिका निवडणुकीला गृहित धरून नागपुरातून एकालाही संधी देण्यात आली नाही, असा नाराजीचा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.

नागपूरचे महापौर प्रवीण दटके यांना पहिल्यांदा गिरीश व्यास यांच्या उमेदवारीमुळे विधान परिषदेत जाता आले नाही. यावेळी पाच जागा असताना दोन सहकारी पक्षाला आणि तीन मुंबईतून उमेदवार देण्यात आले आहेत. मुंबई सोबतच नागपूरचीही निवडणूक आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबईला अधिक महत्त्व दिले दिले जात आहे.

कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर मुंबई महापालिकेवर झेंडा फडकण्याचा भाजपचा विचार आहे. दुसरीकडे गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या नागपूर शहराला फारसे गांर्भीयाने घेतले जात नाही.  या शहराबाबत भाजप अधिक आश्वासक असल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या धुरिणांची रणनीती मात्र कार्यकर्त्यांंच्या पचनी पडलेली नाही. आयात करणाऱ्यांना संधी देण्याच्या राजकारणामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

दटकेंना हुलकावणी

नागपूरचे महापौर प्रवीण दटके यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेवर संधी देण्याचे जवळपास निश्चित मानले जात होते. परंतु ऐनवेळी भाजपचे नेते गिरीश व्यास यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळी पुन्हा दटके यांचे नाव चर्चेत होते. परंतु त्यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 2:37 am

Web Title: bjp sideline nagpur due to upcoming mumbai municipal corporation election
Next Stories
1 ‘समाधान’च्या माध्यमातून अधिकारी ‘लक्ष्य’
2 निवडणुकीवर डोळा ठेवून महापालिकेची नवी ‘टूम’
3 अनाथ बछडय़ांच्या संगोपनासाठी कायमस्वरूपी राज्यस्तरीय समिती
Just Now!
X