जलयुक्त शिवारमुळे राज्यात जलपातळी वाढली आहे. त्याचे लातूर येथे काम बघण्यासाठी गेलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मांजरा नदीपात्रात उतरून सेल्फी काढली. हा प्रकार केवळ उत्साहाच्या भरात झाला असून त्यात गैर काय असा प्रश्न भाजपचे नवनियुक्त प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी उपस्थित केला आहे. नागपूरच्या श्रमिक पत्रकार संघ आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्टतर्फे आयोजित पत्रकारांशी वार्तालाप या उपक्रमात ते बोलत होते.
पंकजा मुंडे या नुकत्याच दुष्काळग्रस्त लातूरच्या मांजरा नदीतील खोलीकरणाचे काम बघण्याकरिता गेल्या होत्या. जलयुक्त शिबिरांतर्गत झालेल्या या कामाची पाहणी करतांना मुंडे यांनी मांजरा नदीपात्रात उतरून सेल्फी काढला. याप्रसंगी त्यांनी फोटोसेशनही करून घेतले. त्यावर राज्यातील विरोधी पक्षांसह अनेक सामाजिक संघटनांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यावर विश्वास पाठक बोलत होते.
ते म्हणाले की, भाजपची भूमिका आधीपासून लहान राज्यांना पूरक आहे. त्यामुळेच एनडीए सरकारच्या काळात उत्तराखंड आणि छत्तीसगड या लहान राज्यांची निर्मिती करण्यात आली. छत्तीसगडसाठी कोणतेही आंदोलन झाले नाही. मात्र, विदर्भाची मागणी शंभर वर्षे जुनी आहे.
केंद्र आणि राज्यात सरकार बहुमतात आहे. असे असताना याकडे दुर्लक्ष का?, यावर त्यांनी बोलण्याचे टाळले. मात्र, सर्वाना विदर्भ हवा असेल तर योग्य वेळी तो दिला जाईल, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली. अ‍ॅड. अणेंनी वेगळ्या विदर्भासाठी सार्वमत घेण्याचे आव्हान भाजप पेलणार का?, यावरही त्यांनी मौन पाळले. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, गिरीश महाजन आदी मंत्री वेगवेगळी वक्तव्ये करून प्रकाशझोतात राहतात. त्यांना कसे आवरणार?, यावर त्यांनी यांची चांगली कामे बघावी असे सांगितले. नागपूर जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप मागे का पडला, याबद्दल विचारले असता, पराभवाचा अभ्यास करण्याची गरज त्यांनी विशद केली.