पक्षामुळेच मोठेपण मिळाले – चंद्रशेखर बावनकुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनता पक्षातील काही ओबीसी नेत्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी पक्षाचे विदर्भातील ओबीसी नेते मात्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण पक्षामुळेच मोठे झालो आणि फडणवीसच आपले नेते असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यात पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते तेव्हा भाजपमध्ये कोणीही त्यांच्या विरुद्ध बोलले नाही किंवा त्यांना आव्हान देण्याची हिंमतही दाखवली नाही. मात्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर व पक्षाला सत्तास्थापनेत अपयश आल्यानंतर पक्षातील नाराज ओबीसी नेत्यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन एक प्रकारे पक्षात फडणवीस यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांची नाराजी अप्रत्यक्षपणे मेळाव्याच्या माध्यमातून व्यक्त केली. मुंबईतील विनोद तावडे यांनी याबाबत अद्याप मौन बाळगले असले तरी त्यांनी खडसे-मुंडे यांनी सुरू केलेल्या मोर्चेबांधणीपासून आपण वेगळे आहोत असे स्पष्ट केलेले नाही.

विदर्भातही ओबीसींची मोठी लोकसंख्या आहे. या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अनेक नेते भाजपमध्ये आहेत.  चंद्रशेखर बावनकुळे हे त्यापैकीच. त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे भाजपच्या पाठीशी उभा राहणारा तेली समाज या निवडणुकीत पक्षापासून दूर गेला. त्यामुळे पूर्व विदर्भातील काही जागाही कमी झाल्या. त्यामुळे बावनकुळेसुद्धा नेतृत्वावर नाराज आहेत, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र त्यांनी स्वत:हून आपला याच्याशी काहीही संबंध नाही, पक्षाने वेळोवेळी संधी दिल्यानेच आपण आमदार आणि मंत्री होऊ शकलो, असे स्पष्ट करीत फडणवीस यांच्या नेतृत्वावरही विश्वास व्यक्त केला. वध्र्याचे खासदार रामदास तडस, माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्यासह इतरही नेत्यांशी ओबीसींच्या मुद्दय़ांवर संपर्क साधला असता त्यांनी पक्षामुळेच समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यामुळेच विदर्भात पक्ष वाढला. पक्षाचे नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्नपूर्वक ओबीसी समाजाला संधी दिली, असे तडस, देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ओबीसीचा मुद्दा विदर्भ भाजपमध्ये गैरलागू ठरतो, असेही या नेत्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान ओबीसीच्या मुद्दय़ावर पक्षातूनच कोंडी करण्याचे प्रयत्न होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर विदर्भातील ओबीसी नेत्यांनी फडणवीस यांच्यावर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा ठरतो. फडणवीस यांनीही बावनकुळे यांना तिकीट नाकारल्यामुळे पक्षाला पूर्व विदर्भात फटका बसला हे प्रथमच जाहीरपणे माध्यमांशी बोलताना मान्य करण्यात आले. यातून ओबीसी नेत्यांचे मोठेपण स्वीकारण्याचेच संकेत मिळतात.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना नेहमीच ओबीसी समाजाचे हित डोळ्यापुढे ठेवले. ओबीसी मंत्रालयासह अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. ओबीसींमुळे पक्ष वाढला हे जसे खरे आहे तसेच पक्षाने संधी दिल्यामुळेच ओबीसी नेत्यांना मोठी पदे सुद्धा मिळाली आहेत. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होतो आहे ही बाब चुकीची आहे. गडकरी, फडणवीस हेच आजही माझे नेते आहेत. -चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री.

भारतीय जनता पक्षाने नेहमीच ओबीसी व या समाजातील नेत्यांना न्याय दिला आहे. देशाचे पंतप्रधानसुद्धा ओबीसी आहेत. विदर्भात अनेक ओबीसी तरुणांना आमदार, खासदार भाजपमुळे होता आले ही बाब कोणी विसरणार नाही, फडणवीस यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.      – रामदास तडस, खासदार, वर्धा

ओबीसींवर अन्याय ही ओरडच मुळात चुकीची आहे.  पक्षाने संधी दिल्यामुळेच मी दोन वेळा आमदार, पक्षाचा प्रतोद, प्रदेशाध्यक्षांचा राजकीय सल्लागार होऊ शकलो. नागपुरात ओबीसी समाजातील अनेक नगरसेवक व नगरसेविकांना महापौर होण्याची संधी मिळाली. विद्यमान आमदारांमध्येही ओबीसींचा समावेश अधिक आहे. त्यामुळे विदर्भात तरी ओबीसींवर भाजप अन्याय करतो असे म्हणणे गैर आहे – सुधाकर देशमुख, माजी आमदार, भाजप

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp vidarbha obc leader devendra fadnavis support akp
First published on: 13-12-2019 at 01:44 IST