News Flash

कामठीत पालकमंत्र्यांना धक्का; काटोलमध्ये ठाकुरांचा ‘विदर्भ माझा’

९ पालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून ते सत्ताधारी भाजपसाठी धक्कादायक ठरले आहेत.

पालिका निवडणुकीत ५ ठिकाणी भाजप, ४ ठिकाणी विरोधकांना यश

नागपूर जिल्ह्य़ातील ९ पालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून ते सत्ताधारी भाजपसाठी धक्कादायक ठरले आहेत. संपूर्ण पालिकांमध्ये पक्षाचा झेंडा फडकाविणार, असा संकल्प करणाऱ्या भाजपला निम्म्या जागांवर म्हणजे ५ ठिकाणी, तर ४ ठिकाणी विरोधकांना यश आले आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी पालिकेत भाजप पराभूत झाली. तेथे काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला व पालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणूनही काँग्रेसचे संख्याबळ आहे. भाजपने बावनकुळे यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्य़ातील पालिका निवडणुकीची जबाबदारी सोपविली होती. इतर पालिकांमध्ये लक्ष  देताना कामठीकडेच त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे निकालावरून स्पष्ट होते. गड आला, पण सिंह गेला, अशी स्थिती सध्या भाजपची झाली आहे. भाजपसाठी दुसरा धक्का काटोल पालिकेत बसला. सर्व प्रतिष्ठापणाला लावूनही तेथील भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांना काटोल पालिकेवर भाजपचा झेंडा फडकाविता आला नाही. भाजपमधून बाहेर पडून विदर्भ माझा या पक्षातर्फे निवडणूक रिंगणात उतरलेल्या चरणसिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा काटोलवरील वर्चस्व कायम राखून पालिकेत बहुमतही प्राप्त केले. राष्ट्वादीचा येथे धुव्वा उडाला. अनिल देशमुख यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी येथे पक्षाच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी दौरे केले होते, तर भाजपच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री आले होते.

पूर्वी काँग्रेसकडे खापा, मोहपा आणि उमरेड पालिका होत्या. यावेळी खापा आणि उमरेडमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. मोहप्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले. कळमेश्वरमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली असली तरी ८ नगरसेवक निवडून आल्याने तो पालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उमरेड पालिकेवरील काँग्रेसची १० वषार्ंची मक्तेदारी भाजप आमदार सुधीर पारवे यांनी मोडीत काढली. तेथे भाजपला बहुमतही मिळाले आहे. खापा आणि मोहपा पालिकेतील पराभवाचे उट्टे काँग्रेसने कामठीत काढले. पालकमंत्र्यांनी कामठी पालिकेवरील त्यांची सत्ता कायम ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. येथील पराभव पालकमंत्र्याना धक्का आहे. भाजपशी युती करणाऱ्या सुलेखा कुंभारे यांच्या पक्षाला येथे केवळ १ जागा मिळाली. नरखेड पालिकेत युवा नेते अभिजित गुप्ता यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकून काँग्रेसला धडा शिकवला. गुप्ता यांच्या गटाचे पाच नगरसेवकही निवडून आले. मात्र, राष्ट्रवादीचे ८ सदस्य निवडून आल्याने तेथे हा पक्ष निर्णायक भूमिकेत असणार आहे. रामटेक पालिकेत शिवसेनेकडून भाजपने सत्ता हस्तगत केली.

नऊ पालिकांच्या निवडणुकीत भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार सभा घेतल्या. संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. काँग्रेसने नोटाबंदीविरोधात जनाक्रोश यात्रा काढली होती. पालिका निवडणुकीत भाजपला मर्यादित यश मिळाले. काँग्रेसच्या पालिकांची संख्या कायम राहिली. मात्र, पालिका बदलल्या. जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासाठी उमरेडची निवडणूक धक्का देणारी, तर कामठीतील निकाल दिलासा देणारे ठरले.

रामटेकमध्ये भाजपचे जय श्रीराम

रामटेक पालिकेत भाजपने मित्रपक्ष शिवसेनेचा दणदणीत पराभव करीत श्रीरामाच्या रामटेकात पक्षाचा झेंडा फडकाविला. १७ जागांपैकी सेनेला येथे फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. पूर्वी या पालिकेत सेनेकडे १४ सदस्य होते. दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. रामटेक विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. गत विधानसभा निवडणुकीत तेथे भाजपने बाजी मारली. यावेळी तेथील आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी सेनेच्या हातून पालिकाही हिसकावून घेतली.

नरखेडमध्ये गुप्ता यांना संधी

नरखेड पालिकेत नगरविकास आघाडीचे अभिजीत गुप्ता हे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले. त्यांचे वडील दिवंगत रमेश गुप्ता अनेक वर्ष नरखेड पालिकेचे अध्यक्ष होते. अभिजीत यांच्या रूपात दुसऱ्या पिढीला नरखेडचा विकास करण्याची संधी लोकांनी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपने ही पालिका जिंकण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न लोकांनी हाणून पाडले.

‘पराभवाबाबत आत्मपरीक्षण करू’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्य़ात घेतलेल्या सभा, केलेली विकासकामे आणि स्थानिक पातळीवरील भाजपचे संघटनात्मक कामामुळे भाजपला पाच नगरपरिषदांमध्ये यश मिळाले. कामठी, काटोल, नरखेडमध्ये यश मिळाले नाही, त्यामुळे तेथील पराभवाबाबत आत्मपरीक्षण करणार आहे. विशेषत कामठीत बरिएमसोबत युती केलेली असताना मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तेथे फारसे यश मिळाले नाही. ९ नगरपरिषदांमध्ये ४२ सदस्य असतानाही संख्या ८० वर झाली असून पक्षाने जिल्ह्य़ात झेप घेतली आहे. काटोलमध्ये चरणसिंग ठाकूर आमच्यासोबत होते. मात्र, त्यांनी विदर्भाच्या मुद्यावर निवडणूक लढली, त्यामुळे त्यांना यश मिळाले. सावनेर आणि मोहप्यात भाजपला चांगले यश मिळाले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विजयाचे सातत्य कायम राहील.

– डॉ. राजीव पोतदार, भाजप जिल्हाध्यक्ष

‘महत्त्वाची कामठी नगरपरिषद जिंकली’

लढाई अटीतटीची होती. अटीतटीच्या या सामन्यात नागपूर जिल्ह्य़ातील महत्वाची कामठी नगरपरिषद जिंकली. याशिवाय, मोहपा नगरपरिषदेतही बाजी मारली. इतर नगरपरिषदांमध्येही चांगली लढत दिली. येथून आता पुढील निवडणुकांमधील विजयाचा रोडमॅप तयार होणार आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपचा काटोल आणि नरखेडमध्ये निभाव लागू शकला नाही.

– राजेंद्र मुळक,

अध्यक्ष, नागपूर जिल्हा

 

निवडणूक निकाल

कळमेश्वर पालिका

एकूण जागा- १७

काँग्रेस- ८

भाजप- ५

राष्ट्रवादी- २

सेना- २

नगराध्यक्ष -स्मृती इखार (भाजप)

मोहपा

एकूण जागा- १७

काँग्रेस- १०

भाजप- ७

नगराध्यक्ष -शोभा काऊटकर (काँग्रेस)

नरखेड

एकूण जागा- १७

राष्ट्रवादी- ८

नविका- ५

सेना- ३

अपक्ष- १

नगराध्यक्ष- अभिजित गुप्ता (नविआ)
खापा एकूण जागा- १७

भाजप- १५

काँग्रेस- १

अपक्ष- १

नगराध्यक्ष- प्रियंका मोहिते (भाजप)

उमरेड

एकूण जागा- २५

भाजप- १९

काँग्रेस- ६

नगराध्यक्ष- विजयालक्ष्मी भदोरिया (भाजप)

काटोल

एकूण जागा- २३

विदर्भ माझा- १८

शेकाप- ४

भाजप- १

नगराध्यक्ष- वैशाली ठाकूर (विदर्भ माझा)

रामटेक

एकूण जागा- १७

भाजप- १३

सेना- २

काँग्रेस- २

नगराध्यक्ष- दिलीप देशमुख (भाजप)

 

सावनेर

एकूण जागा- २०

भाजप- १६

काँग्रेस- ४

नगराध्यक्ष- रेखा मोवाडे (भाजप)

 

कामठी

एकूण जागा- ३२

काँग्रेस- १५

भाजप- ६

बरिएम- १

एमआयएम- १

इतर- ९

नगराध्यक्ष- शहाजहा शफाक अन्सारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 4:32 am

Web Title: bjp win 5 municipal elections and opposition on 4 places in nagpur district
Next Stories
1 विदर्भातील भूजल पातळी घटली
2 भाजपच्या यादीवर वर्चस्व कोणाचे, वाडा की बंगला..
3 छायाचित्रावरूनही वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई
Just Now!
X