जागृत कार्यकर्ता मंचचे पत्र

राजकारण नव्हे तर समाजकारण करण्याचा तसेच गुन्हेगारीमुक्त राजकारणाचा दावा करीत सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नागपूर शहर कार्यकारिणीत पक्षाच्या मूळ तत्त्वाला फाटा देत वाळू चोरी करणारे, हुक्का पार्लर चालविणारे व पक्षात हुजरेगिरी करणाऱ्यांना स्थान दिल्याने पक्षातील निष्ठावंत नाराज झाले आहेत. पक्षाने विविध आघाडय़ा तयार करताना इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र आघाडी न केल्यानेही संताप व्यक्त केला जात आहे.

भारतीय जनता पक्ष जागृत कार्यकर्ता मंच या नावाने एक पत्रक प्रसिद्धी माध्यमांकडे पाठविण्यात आले असून त्यात नव्या कार्यकारिणीमुळे पक्षातील निष्ठावंत व वरिष्ठ कार्यकर्ते नाराज असल्याचा दावा करण्यात आला आहे. २९ मे रोजी शहर अध्यक्ष व आमदार सुधाकर कोहळे यांनी कार्यकारिणी जाहीर केली व १ जूनला हे पत्रक जारी करण्यात आले आहे. यावर कोणाचे नाव नाही. विद्यमान कार्यकारिणीतील काही नावांवर या पत्रकात आक्षेप घेण्यात आला आहे. त्यात वाळू वाहतुकीच्या संदर्भात अलीकडेच गुन्हा दाखल झालेले, हुक्का पार्लर चालविणारे व्यावसायिक आणि  एका अपक्ष नगरसेवकाचा समावेश आहे. पक्षाच्या बैठकांना अनुपस्थित राहणारे, पण निवड समिती व आमदारांची हुजुरी करणाऱ्यांना पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले तर अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या, आंदोलन करणाऱ्यांना केवळ कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्त करून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे. शहर अध्यक्षांनी याची दखल न घेतल्यास आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला धडा शिकविण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार?

निष्ठावंत आणि वरिष्ठांना कार्यकारिणीतून डावलण्यात आल्याने नाराजी आहे. पण ती व्यक्त होत नाही. यापैकी कुणी महापालिका निवडणुकीसाठी,कोणी महामंडळावर, तर कोणाला विशेष कार्यकारी दंडाधिकारीपदासाठी इच्छुक आहे. जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यास त्याचा फटका बसू शकतो, म्हणून सर्व गप्प आहेत, असेही या पत्रकार नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्ष जागृत कार्यकर्ता मंचव्दारे हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या मागचा बोलवता धनी कोण याचीही सध्या भाजपमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

ही संघटनाच अस्तित्वात नाही

भारतीय जनता पक्ष जागृत कार्यकर्ता मंच, अशी कोणतीच संघटना अस्तित्त्वात नाही, कार्यकारिणीवर काही आक्षेप असेल तर त्यांनी शहराध्यक्षांशी चर्चा करावी, यावेळी कार्यकारिणी छोटी केली आहे, त्यामुळे अनेकांना संधी देता आली नाही, त्यामुळे काही नाराज असू शकतात, त्यांनी हा प्रयत्न केला असावा.

आमदार गिरीश व्यास, प्रवक्ते, भाजप