वीज देयक थकबाकीदार नगरसेवकांची नावे जाहीर केली म्हणून संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी एसएनडीएलच्या छापरूनगर कार्यालयात धुडगूस घातला. तेथील साहित्याची तोडफोड करीत दोन अधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यांना डांबून ठेवण्यात आले. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.

शहरातील महाल, गांधीबाग, सिव्हील लाईन्स या तीन विभागात एसएनडीएलकडून (फ्रेन्चाईझी कंपनी)वीज पुरवठा केला जातो. शहराचा ७० टक्के भाग या कंपनीकडे येतो.  कंपनीकडून देयक थकवणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जातो. परंतु शहरात कारवाई करताना सामान्य ग्राहक व विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी व नगरसेवक कंपन्यांकडून वेगळा न्याय दिल्या जात असल्याचा प्रकार प्रथम लोकसत्ताने पुढे आणला होता. काही नगरसेवकांनी वीज देयके भरली नसल्याचे यातून स्पष्ट झाले होते. भाजपशी संबंधित ही थकबाकीदारांची नावे एसएनडीएलने जाणीवपूर्वक प्रसिद्धी माध्यमांकडे देण्यात आल्याचा समज करून भाजपचे माजी महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर, नगरसेवक बंटी कुकडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बुधवारी एसएनडीएलच्या छापरूनगर कार्यालयात धडकले. दुपारी १२.३० च्या सुमारास त्यांनी एसएनडीएल विरोधात घोषणा दिल्या. संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्चाची, दोन दुचाकीची तोडफोड केली, एका कर्मचाऱ्याचा मोबाईल फेकला. एसएनडीएलचे व्यवस्थापकीय संचालक (कार्पोरेट अफेअर्स) स्वप्नेंद्र काबी आणि कार्यालय प्रमुख धर्मेद्र पाटील यांना मारहाण केली.

प्रवीण दटके यांनी एसएनडीएलचे व्यवसाय विभाग प्रमुख सोनल खुराणा यांना दूरध्वनी करून छापरूनगर कार्यालयात बोलावले. ते आल्यावर त्यांच्याशी आंदोलकांची त्यांची शाब्दिक चकमक उडाली. अधिकाऱ्यांना मारहाण व कार्यालयातील तोडफोड प्रकरणाची पोलिसांत तक्रार देणार असल्याचे एसएनडीएलच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले, परंतु राज्यात भाजपची सत्ता असून गृहमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार काय? याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान एसएनडीएल कर्मचारी संघटनेने या प्रकरणात दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

नगरसेवकांच्या बदनामीचा प्रयत्न, भाजपचा आरोप

भाजप नगरसेवकांकडे वीज देयकाची थकबाकी नाही. मात्र त्यांची बदनामी करण्यासाठी एसएनडीएलकडून त्यांची नावे माध्यमांपर्यत पोहोचवली जातात. काही नगरसेविकांना यात जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे.  त्यांच्या नावावर थकबाकी नाही. पण पतीच्या नावावर आहे, असे यावेळी भाजपकडून सांगण्यात आले.

सलग दुसऱ्या दिवशी तोडफोड

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारीही छापरूनगर कार्यालयात याच कारणासाठी अधिकाऱ्याच्या टेबलावरील काच फोडली होती. आज पुन्हा कार्यालयात धुडगूस घालण्यात आला. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

मारहाण व तोडफोड केली नाही

एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी भाजप नगरसेवकांच्या वीज देयक थकबाकीची शहानिशा न करता वृत्तपत्रांकडे चुकीची यादी पाठवली. याबाबत माहिती घेण्याकरिता दोन तास एसएनडीएलच्या छापरूनगर कार्यालयात उभे होतो. एका अधिकारीने भाजपच्या महिला कार्यकर्त्यांशी गैरवर्तन केल्यामुळे त्याची तक्रारही संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली. या मुद्यावरून कार्यकर्ते आणि एसएनडीएलच्या अधिकारी यांच्यात वाद झाला. परंतु कुणालाही मारहाण किवा कार्यालयाची तोडफोड केली नाही. एसएनडीएलचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराणा यांच्याशी चर्चा केली.

– प्रवीण दटके, माजी महापौर व नगरसेवक, भाजप

*  एसएनडीएलच्या विरोधात निदर्शने

*  दोन कर्मचाऱ्यांच्या दुचाकी तोडल्या

*  दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारहाण

* अधिकाऱ्यांना डांबून ठेवले

* कार्यालयातील खूर्चा तोडल्या

* एका कर्मचारीचा मोबाईल फोडला

वीज देयके थकवणाऱ्या राजकीय नेत्यांची यादी एसएनडीएलने प्रसिद्ध केली नाही. कंपनी वीज ग्राहक व थकबाकीदारांमध्ये भेदभाव करीत नाही. देयक थकवणाऱ्यावर नियमानुसार कारवाई केली जाते. भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी छापरूनगर कार्यालयावर केलेला हल्ला व काही अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना दुर्दैवी आहे. त्याची पोलिसांत तक्रार करू.’’

– सोनल खुराणा, व्यवसाय प्रमुख, एसएनडीएल, नागपूर</strong>