मुख्यमंत्र्यांकडून भाजप कार्यकर्त्यांचा समाचार
दुपट्टे घालून नेतेगिरी करून उपयोग नाही, ती फार काळ चालणार नाही, सत्ता मिळाली म्हणून मतदारांसोबतचे अंतर वाढू देऊ नका, अशी ताकीद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधून समस्या जाणून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने महारनगर कार्यकारिणीची बैठक रजवाडा पॅलेसमध्ये आयोजित करण्यात आली होती. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर संघटनात्मक काम वाढविण्यासाठी आणि कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. दिवसभर विविध सत्र झाल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मेळाव्याचा समारोप झाला, त्यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपण सत्तेत आलो म्हणजे जनतेचा आपल्याविषयीचा दृष्टीकोन बदलतो त्यामुळे ते आपल्यापासून दुरावतात. त्यामुळे त्यांच्यासोबतच संपर्क वाढविणे आवश्यक आहे. जनतेसोबतचे अंतर वाढू देऊ नका. सत्तेत आल्यामुळे लोकांची गर्दी आपल्याभोवती जमेल पण ती केवळ काम काढून घेणारी गर्दी असते. त्यामुळे आपल्यामागे गर्दी आहे या मोहात पडू नका, पुढे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका आहेत. केवळ गळ्यात दुपट्टे घालून नेतेगिरी करण्यापेक्षा जनतेशी संवाद वाढावा. त्यांच्या मनात पक्षाविषयी काय आहे हे जाणून घ्या. त्यांच्या काही सूचना असतील तर त्याची अंमलबजावणी करा. तरच येणारी सत्ता ही आपलीच राहील. आमदार, नगरसेवकांनी जनतेमध्ये जाऊन संपर्क वाढवावा, नाहीतर नेतेगिरी टिकणार नाही असा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी दिला. राज्यातील नागपूर हा पहिला डिजिटल जिल्हा होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मेळाव्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, महापौर प्रवीण दटके, डॉ. मिलिंद माने आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाच्या नगर कार्यकारिणीच्या मेळाव्याचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार होता. मुख्यमंत्री मेळाव्याला पोहोचल्यावर नितीन गडकरी लवकरच पोहोचतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री मेळावा आटोपून मुंबईला रवाना झाले. त्यानंतर नितीन गडकरी मेळाव्याला येणार नसल्याचा निरोप आला. उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते गडकरी यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी थांबले असता ते मेळाव्याकडे फिरकले नसल्यामुळे अनेकांची निराशा झाली.