आरोपीही भाजपचेच कार्यकर्ते

नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर उपाध्यक्षाचा गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुतेश्वरनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री  घडली. खून करणारे दोन आरोपीही भाजपचे कार्यकर्ते असून या घटनेने उपराजधानीतील भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

राज विजयराज डोरले (२८) रा. भुतेश्वरनगर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. मुकेश नीलकंठ नारनवरे (२७) आणि अंकित विजयराज चतुरकर (२१) अशी आरोपींची नावे आहेत. राज हा भाजयुमोचा शहर उपाध्यक्ष होता व मुकेश व अंकित हे कार्यकर्ता आहेत. चार महिन्यांपूर्वी मुकेशने राजचा मित्र सारंग याला दारू पिण्याकरिता सोबत नेले होते. याची माहिती मिळताच राजने मुकेशला हटकले व सारंगला दारू पिण्याची सवय लावू नको, अशी समज दिली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. तेव्हापासून दोघांमध्ये तणाव सुरू होता. चार दिवसांपूर्वी पुन्हा ते समोरासमोर आले. त्यावेळी राजने त्याला बघून घेण्याचा इशारा दिला. राज आपल्याला मारणार असा धसका घेऊन मुकेशने आपल्या मित्रासह त्याच्या खुनाची योजना आखली. दररोज रात्री राज हा त्याचा मित्र जयदेव कोरपे यांच्याकडे झोपायला जातो, अशी माहिती आरोपींना होती. ते रात्री अंधारात दबा धरून होते. रात्री १२.३० वाजता राज  घराबाहेर पडताच आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. लाकडी बॅटने त्याच्या डोक्यावर वार केले. तो जमिनीवर पडताच चाकूने त्याचा गळा चिरला.  राजचा भाऊ हेमंत विजयराज डोरले (३१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली.