करोनाच्या संकटकाळात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप करत या विरोधात भाजपच्यावतीने उद्या, शुक्रवारी शहर व जिल्ह्य़ात महाराष्ट्र बचाव  माझे आंगण, माझे रणांगण आंदोलन करण्यात येणार आहे.

महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपने १९ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर  शुक्रवारी आंदोलन केले जाणारआहे. या संदर्भात आमदार अनिल सोले यांच्या अध्यक्षतेत  गणेशपेठ येथील कार्यालयात बैठक झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल सोले म्हणाले, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्यामुळे राज्यात करोनाबाधितांची संख्या व मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यात सर्वच पातळ्यांवर कामगारांच्या हाताला काम नाही. रेशन मिळवण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत आहे. सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात शुक्रवारी भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी आपापल्या निवासस्थानी सामाजिक अंतर व नियमांचे पालन करत काळी पट्टी बांधून सरकारचा निषेध करणार आहेत.

शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके हे पक्षाच्या टिळक पुतळ्याजवळील कार्यालयासमोर काळी पट्टी बांधून बसणार आहेत. कार्यकर्त्यांनी घराच्या बाहेर न येता अंगणात किंवा छतावर सकाळी ११ ते १२ या वेळेत काळी पट्टी बांधून सरकारचा निषेध करावा, असे आवाहन शहर व जिल्हा भाजपने केले आहे. बैठकीला शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, खासदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.