शेतकरी बचाव रॅलीत डॉ. नितीन राऊत यांची स्पष्टोक्ती

नागपूर : मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांत येनकेन प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे. कर्जमाफी असो वा दीडपट हमीभाव योजना असो, शेतकऱ्यांची फसवणूक झाली. आता शेतीविषयक तीन काळे कायदे आणले आहेत. ते शेती आणि शेतकऱ्यांना नेस्तनाबूत करणार आहे. या कायद्यांना महाराष्ट्रात थारा दिली जाणार नाही, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

उमरेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आभासी माध्यमाद्वारे प्रसारण करण्यात आले. याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार राजू पारवे, जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक,  महिला जिल्हा अध्यक्ष तक्षशीला वाघधरे, जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे निरीक्षक रवींद्र दरेकर उपस्थित होते.

भाजप काळ्या कायद्यांच्या माध्यमातून शेती आणि शेतकरी मूठभर भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या नष्ट करून, साठेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या या कायद्यांमुळे  केवळ भांडवलदार मालामाल होणार असून शेतकरी मात्र देशोधडीला लागणार आहे.

प्रदेश काँग्रेसच्या वतीने संगमनेर येथे आयोजित या रॅलीचे प्रास्ताविक बसवराज पाटील यांनी केले. त्यानंतर शेतकरी हक्क लढाई मशाल प्रज्वलित करण्यात आली. याप्रसंगी ग्वाल्हेरवरून पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी तर  महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीवरून भूमिका मांडली.

संगमनेरवरून खासदार राजीव सातव, सा.बां.मंत्री अशोक चव्हाण, तसेच   प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सभेला मार्गदर्शन करून एल्गारचा आवाज बुलंद करण्यास सांगितले. माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र काँग्रेस</p>

प्रभारी एच. के. पाटील यांनीही आंदोलनामागची भूमिका विशद केली.