13 August 2020

News Flash

मेडिकलमध्ये खासगी रक्तपेढीचे दलाल

‘एफडीए’च्या पथकाने २३ जून २०१५ला मेडिकलच्या रक्तपेढीची तपासणी केली.

रक्तपेढीवरील प्रतिबंधाचा लाभ घेण्याचा प्रयत्न
रुग्णांच्या नातेवाईकांना अधिक दराने रक्ताची विक्री
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या रक्तपेढीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) रक्तातील घटक वेगळे करण्यावर प्रतिबंध घातला आहे. रुग्णाला प्लेटलेट, प्लाझ्मासह विविध घटक आणण्याकरिता खासगी रक्तपेढीशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात घेऊन काही खासगी रक्तपेढीचे दलाल मेडिकलच्या वार्डातच पोहोचल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. हे दलाल रुग्णांच्या नातेवाईकांना अधिक दराने रक्ताची विक्री करीत असून त्यामुळे सामान्य नागरिकांची लूट होत आहे. या घटनेने मेडिकलच्या कामावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘एफडीए’च्या पथकाने २३ जून २०१५ला मेडिकलच्या रक्तपेढीची तपासणी केली. त्यात ३९ त्रुटी आढळून आल्याने त्या दूर करण्याची नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार मेडिकल प्रशासनाने काही त्रुटी दूर केल्या. ‘एफडीए’ने पुन्हा ऑगस्टमध्ये तपासणी केल्यावर काही त्रुटी दूर झाल्याचे आढळून आल्यावरही सगळ्याच त्रुटी कायम दाखवत २८ ऑक्टोबरला रक्तपेढीचे बहुतांश काम थांबवण्यात आहे. मेडिकल प्रशासनाचे प्रयत्न व रुग्णांना होणारा त्रास बघता ‘एफडीए’कडून रक्तपेढीला रक्त संकलनासह संपूर्ण रक्त रुग्णांना देण्याची परवानगी देण्यात आली. त्रुटी दूर होईपर्यंत रक्तातील घटक वेगळे करण्याची परवानगी एफडीएने नाकारली.
एफडीएच्या आदेशामुळे रक्तपेढीत रक्तातील ‘प्लेटलेट’, ‘प्लाझ्मा’, ‘आरबीसी’सह इतर घटक वेगळे होणे बंद झाले. त्यामुळे येथील डेंग्यू व जळीत रुग्णांना बाहेरून रक्त आणावे लागत आहे. खासगी रक्तपेढीतील रक्ताची मेडिकलमध्ये मागणी वाढल्याचे दिसताच काही खासगी रक्तपेढींनी अधिक दराने रक्त पुरवणारे दलाल नियुक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे दलाल सर्रास रुग्णांच्या खाटेजवळ नातेवाईकांना गाठत असून मेडिकलमधून संपूर्ण रक्त रुग्णांना देणे हानीकारक आहे, त्याने रुग्णांना धोका संभावतो यासह विविध भीती दाखवतात. रुग्णांना खासगीतून पेढीतून रक्त घेणे आवश्यक असल्याचे पटवून ते स्वस्त: उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देतात. शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांकडून जास्त पैसे घेऊून ते उपलब्ध करून दिले जाते.
या प्रकाराने मेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्या शेकडो रुग्णांना दररोज आर्थिक फटका बसत आहे. या दलालांना मेडिकलला सुरक्षा रक्षकांकडूनही प्रतिबंध होताना दिसत नाही. तेव्हा या जवानांचेही दलालांसोबत काही हितसंबंध आहेत काय? हा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत. मेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांची लूट थांबवण्याकरिता मेडिकल प्रशासन काय करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

चौकशी करणार
– डॉ. निसवाडे
मेडिकलच्या वार्डात खासगी रक्तपेढीच्या व्यक्तींना प्रतिबंध आहे. परंतु ते प्रवेश करीत असल्यास हे प्रकरण गंभीर आहे. तातडीने या प्रकरणाची चौकशी करून योग्य कार्यवाही केली जाईल. प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही याबाबत काही माहिती मिळते काय? हे तपासले जाईल, असे मत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2015 3:03 am

Web Title: black marketing of blood bank
Next Stories
1 ‘हायटेक’ची चर्चाच अधिक, काम मात्र कमी
2 एकाधिकार योजनेअंतर्गत ४०० क्विंटल कापूस खरेदी
3 परवानाधारक बंदूकधारी प्रतिनिधी नेमण्याचा आमदारांना अधिकार ?’
Just Now!
X