बजाजनगर चौकात आंदोलन :- नागपूर सुधार प्रन्यासने झाडे लावण्याचे दिलेले काम पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या बीव्हीजी कंपनीला आता कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. काळ्या यादीतील कंपनीला महापालिकेने पुन्हा काम कसे दिले, असा सवाल जय जवान जय किसान संघटनेने उपस्थित केला आहे.

शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट एजी आणि बीव्हीजी कंपनीला मिळाले आहे. परंतु त्यांचा तितका आवाका नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग गोळा झाले आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी या संघटनेने कचरा उचला आंदोलन केले. त्यानंतर महापालिका आयुक्तांना भेटून शहरातील कचऱ्याची स्थिती आणि ज्या कंपनीला कचरा उचलण्याचे कंत्राट मिळाले, त्या कंपनीबद्दल आक्षेप घेण्यात आले.

शहराला दोन भागात विभागून दोन कंपन्यांना कचरा उचलण्याचे काम देण्यात आले आहे. एजी आणि बीव्हीजी कंपन्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे घरोघरी आणि अनेक मार्गावर कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. त्यामुळे जय जवान जय किसान संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कचरा उचला आंदोलन केले. बजाजनगर चौकातून आज दुपारी दीड वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला. तेथून व्हीएनआयटी रोडवर मोठय़ा प्रमाणावर सडका, कुजलेला कचरा पडून होता. जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी कचरा जेसीबीच्या साहाय्याने टिप्परमध्ये भरून महापालिका मुख्यालयाच्या दिशेने कूच केली.

यावेळी प्रशांत पवार यांनी दोन दिवसात शहर कचरामुक्त न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर ट्रकने कचरा आणून टाकला जाईल, असा इशारा दिला. नगरसेवक दुनेश्वर पेठे आणि अरुण वनकर यांनीही सभेला संबोधित केले.