विदर्भाचा संघ प्रथमच राज्यपातळीवर

क्रिकेट असोसिएशन ऑफ ब्लाईंड महाराष्ट्राच्यावतीने पहिल्यांदाच अंध मुलींसाठी राज्यस्तरीत अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा नाशिकच्या जिजाऊ मदानावर होणार आहेत. यात विदर्भातील अंध मुली सहभागी होणार असून त्यांनी ही स्पर्धा आम्हीच जिंकू, असा निर्धार व्यक्त केला आहे.

आत्मदीप सोसायटी नागपूरने अंध मुलींच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने राज्यस्तरीय क्रिकेट स्पध्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विदर्भातील २२ अंध मुलींची चाचणी घेण्यात आली. त्यातून १४ मुलींची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व मुलींमध्ये शंभर टक्के दृष्टिहीन (बी-१), आणि त्यापेक्षा किंचित कमी (बी २) दिसणाऱ्या आणि थोडे दिसणाऱ्या (बी ३) मुलींचा समावेश आहे.

नियमानुसार प्रथम अकरा खेळाडूंमध्ये चार खेळाडू हे बी १ श्रेणीतील, तीन बी २ श्रेणीतील, तर पाच बी ३ श्रेणीतील असतील. स्पध्रेत मुंबईच्या दोन तर नाशिक, पुणे, मराठवाडा आणि नागपूर असे सहा संघ सहभागी झाले आहेत. १७ व १८ फेब्रुवारीला होणाऱ्या स्पध्रेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलींची महाराष्ट्राच्या संघात निवड केली जाईल.

विदर्भ संघाला सरावासाठी मदान उपलब्ध होत नव्हते. अंबाझरी येथील धरमपेठ शिक्षण संस्थेने पुढाकार घेऊन महाविद्यालयाचे मदान दिले. तसेच अंध मुलींना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यासाठी अंध मुलांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार अतुल हारोडे याच्यावर जबाबदारी दिली आहे. तब्बल एक महिना अतुलने मुलींना क्रिकेटचे सर्व नियम आणि बारकावे समजावून सांगत चांगलाच सराव करून घेतला. विदर्भ संघाची कर्णधार नागपूरची अंकिता शिंदे असून तिच्या नेतृत्वात आज संघ नाशिकला रवाना झाला आहे. सर्व सामने १० षटकांचे असून जड प्लास्टिकच्या (र्छे असलेल्या ) चेंडूने खेळवण्यात येणार आहे. स्पध्रेसाठी लागणारे सर्व क्रीडा साहित्य पर्सिस्टन्ट फाऊंडेशनने दिले आहे.

आत्मदीपम् सोसायटी नागपूरच्या संस्थापक अध्यक्षा जिज्ञासा चवलढाल यांनी सांगितले, सर्व मुली गरीब घरच्या असून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. आमच्या संस्थेत त्यांना आत्मनिर्भर करण्यास प्राधान्य देतो. मुलींचा शारीरिक विकास व्हावा म्हणून आम्ही क्रिकेटकडे वळलो. मुलींमध्ये प्रतिभा असल्यास या स्पध्रेच्या माध्यमातून त्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्थानावरही जाऊ शकतात. त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आमची प्राथमिकता समजतो.

विदर्भ संघ

अंकिता शिंदे (कर्णधार), आरती अतकरी (उपकर्णधार), पूजा राऊत, िपकी ठाकरे, वर्षां मेश्राम, शीतल खेकडे, हिमा आंबेकर, निकिता कनके, करिश्मा रेहपडे, अंकिता भावने, पल्लवी धाबर्डे, शालू वाघाडे, प्राजक्ता उधे, भारती माऊसकर, गोकुळ पारधी (व्यवस्थापक), अतुल हारोडे (प्रशिक्षक).

मी उत्साहित झाले आहे. यापूर्वी कधीच क्रिकेट खेळले नव्हते. मी शंभर टक्के अंध आहे. अशात संघाचे नेतृत्व माझ्याकडे असल्याने जबाबदारी वाढली आहे. सराव भरपूर केला असून संघासाठी विजयाचे ध्येय बाळगले आहे. चषक जिंकण्याचा मानस केला आहे.

अंकिता शिंदे, कर्णधार विदर्भ अंध क्रिकेट संघ