|| महेश बोकडे

अत्यवस्थ रुग्णाला रक्ताची गरज भासताच नातेवाईक जवळच्या शासकीय किंवा खासगी रक्तपेढीत धाव घेतात. परंतु पूर्व विदर्भातील शासकीय रक्तपेढीत १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०१९ या काळात रुग्णांसाठी रक्त घेऊन गेलेल्या नातेवाईकांपैकी केवळ १.२६ टक्के इतक्या कमी लोकांनीच परतावा म्हणून रक्तदान केल्याचे पुणे येथील आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे, यात एकही महिला नाही.

अपघात, प्रसूती, शस्त्रक्रियेदरम्यान होणारा अतिरिक्त रक्तस्राव किंवा इतरही आजारांच्या रुग्णांना तातडीने रक्ताची गरज भासते. हे रक्त खासगी किंवा शासकीय रक्तपेढीतून मिळवले जाते.

पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या सहा जिल्ह्य़ांमध्ये १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०१९ या आठ महिन्यात शासकीय रक्तपेढींकडून आयोजित रक्तदान शिबीर किंवा रक्तपेढीत ३२ हजार ४५० जणांनी रक्तदान केले.

परंतु रक्त मिळवणाऱ्यांपैकी वर्धा, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांतील एकाही रुग्णाच्या नातेवाईक वा मित्रांनी परतावा म्हणून रक्तदान केले नाही.

नागपूर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात परतावा म्हणून रक्तदान करण्यात आले. परंतु हे प्रमाण अत्यल्प आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, नागपूर जिल्ह्य़ातील मेडिकल, मेयो, डागा, सुपरस्पेशालिटी या रुग्णालयांतील रक्तपेढीत परतावा म्हणून केवळ ५४, चंद्रपूर १६१, गोंदिया २०५ जणांनीच रक्तदान केले.

या रक्तदानामुळे पूर्व विदर्भातील शासकीय रुग्णालयांत दाखल अनेक रुग्णांचे जीव वाचवण्यात प्रशासनाला यश मिळाले.

महिलांची संख्या अत्यल्प

पूर्व विदर्भातील शासकीय रक्तपेढीमध्ये वरील कालावधीत रक्तदान करणाऱ्या सर्व संवर्गातील ३२ हजार ४५० रक्तदात्यांमध्ये केवळ १ हजार ७२ महिलांचा समावेश आहे. त्यातही वर्धा- ५२, भंडारा- ५७, गडचिरोली- ३३, अहेरी- ३६ आणि नागपुरातील डागा- ५४,  सुपरस्पेशालिटी- १७ या  रक्तपेढींना तीन अंकी आकडाही गाठता आला नाही.