प्रवाशांना मात्र अतिरिक्त पैसे मोजावे लागणार

विमानतळावर प्रवाशांना बोर्डिग पास सहज उपलब्ध व्हावा आणि त्यांच्या सामानांची तपासणी अधिक सुलभ व्हावी यासाठी देशातील प्रमुख विमानतळावर असलेली ‘कॉमन युझ टर्मिनल इक्पिमेंट सिस्टम’ ही प्रणाली नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू केली जाणार आहे. यासाठी येणारा खर्च मात्र प्रवाशांकडून वसूल केला जाणार आहे.

मिहान इंडिया लिमिटेड आणि एसआयटीए या कंपन्यांशी यासंदर्भात करार झालेला आहे. त्यानुसार एसआयटीए ही कंपनी विमानतळावर काऊंटर आणि सामानाची तपासणी करणारी उपकरणे लावणार असून या माध्यमातून विविध विमान कंपन्यांना विमानतळावर उपलब्ध कोणताही काऊंटर वापरता येईल. प्रत्येक काऊंटरवरून सर्वच विमान कंपन्यांचे बोर्डिंग पास मिळेल. त्यामुळे प्रवाशांना अधिक काळ रांगेत उभे राहावे लागणार नाही.

सध्या ज्या विमान कंपनीचे तिकीट असेल त्याच कंपनीच्या काऊंटवर ‘बोर्डिग पासेस’ उपलब्ध होते. तसेच त्याच कंपनीच्या काऊंटरवर सामानाच्या बॅगला सुरक्षा टॅग लावले जाते.  नव्या प्रणालीसाठी कतार एअरवेज आणि एअर अरेबिया कंपन्यांनी एसआयटीएशी करार केला आहे. एअर इंडियाचा करार अंतिम टप्प्यात आहे. इंडिगो, गो एअर आणि जेट एअरवेजशी करार झालेले नाही.

प्रवाशांवर भूर्दंड

ही प्रणाली सुरू झाल्यानंतर नागपूर विमानतळावर प्रवाशांना अतिरिक्त रक्कम द्यावी लागेल. पहिले दोन वर्षे प्रती प्रवासी ५९ रुपये, तिसऱ्या वर्षी ६२ रुपये, चौवथ्या वर्षी ६४ रुपये आणि पाचव्या वर्षी ६६ रुपये मोजावे लागतील.नागपूर विमानतळावर ही प्रणाली दोन ते तीन महिन्यात कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. एअर इंडियाला प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा आहे. तसेच इंडिगो, गो एअरवेज आणि जेट एअरवेज हे लवकरच करारबद्ध होतील.

– व्ही.एस. मुळेकर, वरिष्ठ संचालक,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ.