समितीच्या अहवालानंतरही विद्यापीठ ढिम्मच

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना चुकीच्या पदव्या वितरित केल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. त्यामुळे विद्यापीठाने नवीन पदव्या देण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित केली. या समितीने चौकशीत एवढी मोठी चूक विभागाच्या लक्षात न आल्याने प्रथमदर्शनी जनसंवाद विभागाला दोषी ठरवले. मात्र, विद्यापीठाने अद्याप कुणावरही कारवाई न केल्याने प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वर्ष २००२ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘पोस्ट ग्रॅज्युएट इन मास कम्युनिकेशन’अभ्यासक्रमाच्या नावात बदल केला. यानंतर सर्व विद्यापीठांना ‘मास्टर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन’ नावाने अभ्यासक्रम सुरू करण्याचे आदेश दिले. नागपूर विद्यापीठाने वर्ष २००८-०९ मध्ये तो बदल स्वीकारला. परंतु, विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांना ‘मास्टर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन’ची पदवी दिली आहे, तर काही विद्यार्थ्यांना ‘मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन’ (एमएमसी)ची पदवी दिली आहे. परिणामी, जो अभ्यासक्रम बंद झाला, त्या विषयाची पदवी देऊ न विद्यार्थ्यांना संकटात टाकण्याचे काम विद्यापीठाने केले. या प्रकरणाचा ऊहापोह झाल्यानंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली. २०१६ व २०१७ च्या शैक्षणिक सत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली. दरम्यान, विद्यापीठाने एकूण ५९ विद्यार्थ्यांना पदवी दिली. यातील जवळपास ३० विद्यार्थ्यांना चुकीच्या नावाने पदव्या दिल्या. त्या पदव्या विद्यापीठाने परत मागितल्या असून नव्याने पदव्या देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. परंतु, ती छपाईची चूक असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले. प्रशासनाचे आपली चूक मान्य केली असली तरी पदवी वितरित करण्याआधी ही चूक जनसंवाद विभागाच्या लक्षात येणे आवश्यक होते. मात्र असे न झाल्याने हे प्रकरण घडले. त्यामुळे जनसंवाद विभागाच्या प्रमुखांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अद्याप कारवाई न केल्याने विद्यापीठ प्रशासनावर संशय बळावत आहे.