News Flash

मेडिकलमध्ये तोतया डॉक्टरला पकडले!

चक्क रुग्ण तपासत होता; करोना संशयितांचे नमुनेही घेतले

चक्क रुग्ण तपासत होता; करोना संशयितांचे नमुनेही घेतले

नागपूर :  मेडिकलच्या वार्डात गुरुवारी सकाळी चक्क रुग्ण तपासताना एका तोतया डॉक्टरला मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने पकडले. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच तेथे खळबळ उडाली. अजनी पोलिसांच्या प्राथमिक निरीक्षणात या तोतया डॉक्टरने मेडिकलला काही करोना संशयितांचे नमुनेही घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

सिद्धार्थ मनोज जैन (२३) रा. झेंडा चौक, महाल असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांना त्याने कमला नेहरू महाविद्यालयातून बीएस्सी नर्सिगचा अभ्यासक्रम केल्याचे सांगितले. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो रुग्णसेवेच्या अनुभवासाठी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून मेडिकलमध्ये विविध वार्डात रुग्ण तपासत होता. त्याला वडील नाही. आई गृहिणी आहे. नातेवाईकांच्या मदतीने त्याने शिक्षण पूर्ण केले. गुरुवारी सकाळी तो कॅज्युल्टीत आला. त्याने शल्यक्रिया गृहातील डॉक्टरांप्रमाणे कपडे घातले होते. येथे  रुग्णांची तपासणी करत असताना मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना  संशय आला. त्यांनी लगेच ही माहिती वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला दिली. येथील सूचनेनुसार महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांना दक्ष झाले. बाहेर पळण्यासाठीचे मार्ग बंद करण्यात आले. तोतया डॉक्टरने काही रुग्णांना बघितले व नंतर तो इतर वार्डात जात असताना त्याला कुणीतरी पाठलाग करत असल्याचे लक्षात आले. त्याने पळण्याचा प्रयत्न करताच जवानांनी त्याला पकडले. प्रथम त्याला वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात आणले गेले. त्यानंतर अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले गेले. पोलिसांच्या चौकशीत बरीच माहिती पुढे आली.   अजनी पोलीस ठाण्याचे विनोद चौधरी म्हणाले, हा तोतया डॉक्टर मेडिकलच्या विविध वार्डात फिरायचा. करोना संशयितांचे नमुने घेतल्याचे त्याने कबूल केले आहे. चौकशीत या प्रकरणाची माहिती पुढे येईल. त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या विभागातील डॉक्टर असल्याचे सांगायचा

मेडिकलच्या विविध वार्डात फिरताना त्याला निवासी डॉक्टरांनी विचारल्यास तो स्वत:ला मुख्य निवासी डॉक्टर असल्याचे सांगायचा  तर मुख्य निवासी डॉक्टरांनी  विचारल्यास तो त्यांना औषधशास्त्र विषयाचा निवासी डॉक्टर असल्याचे सांगायचा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 2:19 am

Web Title: bogus doctor caught in government medical college and hospital in nagpur zws 70
Next Stories
1 ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकाराचे धडे! 
2 Coronavirus : रुग्णालयांत दाखल रुग्णसंख्या पाचशेहून कमी
3 महापालिकेत औषधांचा कोटय़वधींचा गैरव्यवहार
Just Now!
X