शेतीच्या वादातून एका दाम्पत्याचा खून करणाऱ्यास यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. रमेश किसन राठोड (५५, रा. लिंगी, वाई, ता. दिग्रस) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
जीमा पवार आणि जनाबाई जीमा पवार अशी मृतांची नावे आहेत. जीमा पवार याने एकनाथ पराडकर यांची दोन एकर शेती कसण्यासाठी अध्र्या वाटय़ाने घेतली होती. फेब्रुवारी २००६ मध्ये त्यांनी शेतात भूईमूग लावलेला होता. त्यामुळे जीमा पवार आणि जनाबाई हे शेतातच राहत होते. दरम्यान, रमेशचा भाऊ नरेश पवार आणि जीमा पवारच्या शेजारी राहायला गेला.
नरेश हा आपले शेत बळकावेल अशी भीती रमेशला होती. त्यामुळे १० एप्रिल २००६ ला रमेशने जीमा पवार याच्याबरोबर नरेशला राहण्यासाठी जागा देण्यावरून भांडण केले होते. ११ एप्रिलला नरेश हा आपल्या कुटुंबासह सायखेडा नावाच्या गावी गेला असता रमेशने जीमा पवारच्या सुनेशी वाद घातला. या भांडणात त्याने जीमा आणि त्याची पत्नी जनाबाई यांच्यावर वसंता पराडकर यांच्या शेतात काम करताना चाकूने हल्ला केला आणि त्यांना ठार मारले.
या प्रकरणात दिग्रस पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीविरुद्ध अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांसमोर खटला चालविला. सर्व साक्षीपुरावे तपासून न्यायालयाने रमेशला जन्मठेप आणि १० हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. त्याविरुद्ध रमेशने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीची जन्मठेप कायम ठेवली.