वाहनांची तपासणी, तस्करांवरही लक्ष

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात राज्याच्या सीमावर्ती भागातून होणारी मद्य आणि इतर तस्करी रोखण्यासाठी तसेत तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर संयुक्त तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच ११ एप्रिलपूर्वी दोन्ही राज्याच्या सीमा सिल करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर तपासणी नाके सुरु करण्यासंदर्भात सौंसर येथे दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. जिल्ह्य़ातील नागपूर व रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान आहे. या काळात सीमावर्ती राज्यातून होणारी अवैध दारू आणि प्रवासी वाहतूक थांबवणे तसेच असामाजिक तत्त्वांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील सीमेवरील तपासणी नाक्यावर २४ तास स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. हा बंदोबस्त निवडणूकपूर्वी ८ ते ११ एप्रिलपर्यंत राहणार आहे.मतदानाच्या दिवशी सीमा सिल करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी सांगितले.

सावनेर तालुक्यात केळवद, चिरोंजी, खुर्सापार येथे, रामटेक तालुक्यातील कोलितमारा, मानेगाव टेक (जबलपूर), भंडारबोडी (भंडारा) येथे तर काटोल तालुक्यातील उमरीकला, राजुरा, लांगा-करवार-पिंपळाकोठा व वडचिचोली (चौरखवरी) येथे तपासणी पथके तैनात राहणार आहेत.

‘‘दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात दोन राज्याच्या सीमेवर अवैध वाहतूक, मद्य तस्करी तसेच वाहन तपासणीसाठी समन्वयाने काम करण्याचा निर्णय झाला. ’’

– अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी नागपूर