शेतकरी कोहळे कुटुंबावर शोककळा

शेतकरी कुटुंबातील बारा वर्षीय मुलाने सकाळी वडिलांकडे नवीन दप्तर घेऊन देण्याचा हट्ट धरला. वडिलांनी नकार दिल्यावर मुलाने दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. शिवम राजेश कोहळे (१२) रा. मानेगाव, असे या मुलाचे नाव आहे. तो गावातील एका शाळेत शिकतो. वडील शेतकरी आहेत. सध्या शेतीचा हंगाम असल्याने संपूर्ण कुटुंब त्या कामात व्यस्त होते. रविवारी शिवमने वडिलांकडे नवीन दप्तराची मागणी केली. वडिलांनी सुरुवातीला नकार दिला, परंतु मुलाचा हट्ट बघून त्यांनी शेतातील काम संपवून घरी परत आल्यावर ठरवू असे त्याला सांगितले. मात्र, दप्तर मिळणार नसल्याचा समज करून शिवमने घराच्या पहिल्या माळ्यावरील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. शिवम खाली येत नसल्याने त्याच्या बहिणींनी शोध घेतला असता त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

आई भोवळ येऊन पडली

शिवमने गळफास घेतल्याची माहिती कळताच आई-वडील दोघेही धावतच घरी पोहोचले. शिवमचा मृतदेह बघताच त्याच्या आईला दारातच भोवळ आली व त्या पडल्या. या घटनेमुळे कोहळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.