पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केले; एकूण चार जणांना अवयवदान

बीएसएनएल कर्मचारी नत्थूजी अकडूजी वंजारी (५८) यांचे मेंदूआघाताने निधन झाले. मात्र सेव्हन स्टार रुगणालयात ते दाखल असताना मेंदू पेशी मृत पावत असल्याचे डॉ. संदीप नागमोते यांच्या निदर्शनास आले. तेव्हा लगेच त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना अवयदानाचे महत्त्व पटवून दिले. वंजारी परिवाराने मनाचा मोठेपणा दाखवत अवयदानाचा निर्णय घेतला. अवयदानामुळे चार जणांना जीवनदान  मिळाले. विशेष म्हणजे, नागपुरातून प्रथमच फुफ्फुसाचे दान झाले असून ते थेट मुंबईला पाठवण्यात आले.

नत्थूजी वंजारी घरात एकमेव कर्ते पुरुष होते. त्यांच्या मेंदूला आघात झाल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी नंदनवनमधील सेव्हन स्टार रुगणालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान प्रकृती खालवत असल्याने त्यांच्या मेंदूपेशी मृत होत गेल्या. त्यांच्या जगण्याची आशा धूसर होत गेली. अशात डॉक्टरांनी वंजारी कुटुंबाला अवयदानाबद्दल समुपदेशन केले व अवयदानाचे महत्त्व सांगितले. वंजारी परिवाराने अवयदानाची परवानगी दिली. यानंतर वैद्यकीय यंत्रणेच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या.  संबंधित यंत्रणेने अवयवांची गरज असलेल्या गरजूंची प्रतीक्षा यादी तपासली असता मुंबई येथील ग्लोबल रुग्णालयात एक महिला फुफ्फुसांच्या प्रतीक्षेत आढळली. त्यानुसार शुक्रवारी पहाटे शहर पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार करून डॉ.बी.व्ही भास्कर, डॉ. उन्मिल शहा, डॉ. लक्ष्मण निसारीकर यांच्या नेतृत्वातील चमूने फुफ्फुस घेऊन काही मिनिटात विमानतळ गाठले आणि मुंबईच्या दिशेने उड्डाण केले. त्याशिवाय न्यू इरा रुग्णालयात यकृत व मूत्रिपड तर वोक्हार्टमध्ये मूत्रिपडाचे रुग्ण प्रतीक्षेत असल्याचे आढळून आले. नत्थूजी वंजारी यांच्यामुळे चार जणांना जगण्याची नवी आशा निर्माण झाली आहे.