आज १५ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. मृत शरदच्या बहिणीनेही भावासाठी रक्षाबंधनाच्या एक दिवासापूर्वी राखी घेऊन ठेवली होती. तो उद्या नोकरीवरुन घरी आला की त्याला ती बांधू, याच आनंदात ती होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शरदच्या वाहनाला अपघात घडला आणि त्याला डॉक्टरांनी मेंदूमृत जाहीर केले. हा आघात कुटुंबीयांना पचवणे कठीण होते. परंतु याही स्थितीत कुटुंबीयांनी अवयवदानाचा आदर्श निर्णय घेतला. शरदने जग सोडतानाही सहा जणांना जीवनदान दिले. त्याचा अंतिम प्रवास सुरू झाला तेव्हा त्याच्या बहिणीने त्याच्याचसाठी घेऊन ठेवलेली  राखी त्याच्या मृतदेहाला बांधली. काळीज हेलावणारे हे दृश्य बघून उपस्थितांनाही अश्रूंचा बांध रोखता आला नाही.

शरद परतेकी (३०, रा. पार्वतीनगर, नागपूर) असे या दुर्दैवी भावाचे नाव आहे. त्याचा मेंदूमृत झाल्याचे निदान झाले. जागतिक अवयवदान दिनी १३ ऑगस्टला त्याचा भाऊ विनोद, पत्नी शीतलसह इतर घरच्या सदस्यांनी अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला. बुधवारी त्याचे हृदय, दोन्ही मूत्रपिंड, यकृत आणि दोन्ही नेत्र विविध रुग्णालयांत दाखल रुग्णांवर प्रत्यारोपित होऊन सहा जणांना नवे जीवन मिळाले.

शरदला पत्नी शीतल, सात महिन्यांचा मुलगा आरव, वृद्ध आई, दोन भाऊ आणि आप्तपरिवार आहे. शरद विजया बँकेत लिपिक पदावर कार्यरत होता. त्याने प्रथम गोंदिया व त्यानंतर बीड येथे सेवा दिली. ११ ऑगस्टला तो काही मित्रांसह बीड येथे दुचाकीवरअसताना त्याच्या वाहनाला कारने धडक दिली. अत्यवस्थ अवस्थेत त्याला तेथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मेंदूत रक्तस्राव असल्याने तातडीने त्यावर शस्त्रक्रिया झाली. प्रकृती खालावल्यावर त्याला व्हेंटिलेटरवर नागपूरच्या ट्रॉमा केअर सेंटर येथे १३ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजता दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत मेंदूमृत असल्याचे निदान झाले. ही माहिती डॉक्टरांनी परतेकी कुटुंबाला देत अवयवदानाचे महत्त्व सांगितले. भाऊ विनोद परतेकी याने पुढाकार घेत अवयवदानाला संमती दिली.  ही माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या डॉ. विभावरी दाणी, डॉ. रवि वानखेडे, वीणा वाठोडे यांना देण्यात आली. समितीने दिल्लीच्या नोटाला सूचित केल्यावर अवयवांची गरज असलेल्या रुग्णांचा शोध सुरू झाला. पुणे येथे ३० वर्षीय तरुणी हृदयाच्या, नागपुरात ६१ वर्षीय व्यक्ती यकृताच्या, तर सुपरस्पेशालिटी आणि केयर रुग्णालयातील प्रत्येकी एक रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत असल्याचे कळले.

१४ ऑगस्टला नियोजन करून हे अवयव विविध रुग्णालयांत नेऊन तेथील रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. पुण्याहून विशेष विमानाने हृदय घेण्यासाठी वैद्यकीय चमू आला होता. त्यांच्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांकडून मानवंदना

शरद परतेकी यांचा मृतदेह ट्रॉमातील प्रमुख भागात ठेवण्यात आला. येथे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, ट्रॉमा केअर सेंटरचे प्रमुख डॉ. मोहम्मद फैजल, प्रा. डॉ. नरेश तिरपुडे, मेंदू शल्यचिकित्सक डॉ. पवित्र पटनाईक यांच्यासह येथील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या सदस्यांनी शरदला मानवंदना देत पुष्पचक्र अर्पण केले.