पूर्व विदर्भातील करोना काळातील चित्र

नागपूर :  १ जानेवारी २०१९ ते २० एप्रिल २०२१ या कालावधीत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ांत करोनाचे २ लाख ६७ हजार २७२ रुग्ण आढळले. त्यातील ४ हजार ३९७ रुग्णांचा मृत्यू झाला. परंतु, या काळात येथे एकही ‘स्वाईन फ्लू’चा रुग्ण आढळला नाही. मेंदूज्वरामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही २९.७२ टक्के नोंदवले गेले. माहिती अधिकारातून हा तपशील समोर आला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ांत वरील कालावधीत करोनाच्या मृत्यूचे प्रमाण १.६४ टक्के आहे. दरम्यान, करोनापूर्वी पूर्व विदर्भातील प्रत्येक जिल्ह्य़ात कमी-अधिक प्रमाणात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळायचे. त्यातील काहींचा मृत्यूही व्हायचा. परंतु करोना काळात एकाही स्वाईन फ्लूच्या रुग्णाची नोंद नाही. वरील कालावधीत मेंदूज्वराचे पूर्व विदर्भात ३७ रुग्ण आढळले. त्यातील ११ रुग्णांचा  मृत्यू झाला. मेंदूज्वरग्रस्तांत १५ रुग्ण चंद्रपूर, ११ रुग्ण गडचिरोली, १ रुग्ण नागपूर, ८ रुग्ण वर्धा, १ रुग्ण भंडारा, १ रुग्ण गोंदियातील आहे. मेंदूज्वरामुळे दगावलेल्या रुग्णांत वध्र्यातील १, गोंदिया १, चंद्रपूर ५, गडचिरोलीतील ४ रुग्णांचा समावेश आहे. या काळात डेंग्यूचे १,७२४ रुग्ण आढळले. त्यातील १० रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वाधिक ७ मृत्यू नागपुरात तर ३ मृत्यू वर्धा जिल्ह्य़ात नोंदवले गेले. या काळात हिवतापाचे पूर्व विदर्भात १० हजार ९९४ रुग्ण आढळले.

त्यातील २१ रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वाधिक ९ मृत्यू गडचिरोलीत, ५ गोंदिया, ४, चंद्रपूर, २ भंडारा, व १ नागपुरात नोंदवला गेल्याचेही माहितीच्या अधिकारात सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले.

गोंदिया जिल्ह्य़ात निम्माच निधी खर्च

१ जानेवारी २०१९ ते २० एप्रिल २०२१ या कालावधीत गोंदिया जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणेसाठी शासनाने १० कोटी ६० लाख ४४ हजार रुपयांचा निधी दिला. त्यातील निम्मा म्हणजे केवळ ५ कोटी ३२ लाख ४ हजार रुपयांचाच निधी खर्च झाला. नागपूर ग्रामीणला ४६.६४ लाखांचा निधी मिळाला असून ४६.३३ लाख रुपये खर्च झाले. वर्धेत ११ कोटी १९ लाख ११ हजारांचा निधी मिळाला, त्यातील ८ कोटी ४७ लाख ८३ हजार रुपये खर्च झाले. भंडाऱ्याला ८ कोटी ४५ लाख ९० हजारांचा निधी मिळाला असून त्यातील ६ कोटी २० लाख ५७ हजार रुपये खर्च झाले. चंद्रपूरला ४ कोटी ६९ लाख ९४ हजारांचा निधी मिळाला असून त्यातील ३ कोटी ५० लाख ७१ हजार रुपये खर्च झाले. गडचिरोलीला ८ कोटी ८४ लाख ४४ हजारांचा निधी मिळाला असून त्यातील सर्वच निधी खर्च झाल्याचेही माहितीच्या अधिकारात पुढे आले.