पुणे, मुंबई, दिल्लीच्या विविध कंपन्यांनी दालने उघडली

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : गेल्या काही महिन्यांमध्ये उपराजधानीच्या विविध भागात पुणे, मुंबई, दिल्लीसह इतर शहरातील विविध ब्रांडेड कंपन्यांची चहाची दालने (आऊटलेट्स) वाढत आहेत. त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा व्यवसाय वाढत असल्याचे बघत त्यात नागपूरच्याही उद्योजकांनी उडी घेतली आहे.

अमृततुल्य चहा, प्रेमाचा चहा, चहापाणी, साईबा अमृततुल्य चहा, अशा अनेक कंपन्यांची दालने पुण्यात आहेत. मुंबईतही या कंपन्यांची दालने आहेत. ही दालने मोठय़ा शहरात वाढत असतानाच गेल्या काही महिन्यात ब्रांडेड चहा विक्रेत्यांनी नागपूरकडेही मोर्चा वळवला आहे. उपराजधानीत सुरुवातीला पुण्यातील येवले, प्रेमाचा चहा, साईबा अमृततुल्य चहाची दालने सुरू झाली. त्याला नागरिकांचा प्रतिसाद वाढत होता.

हे बघून त्यात मुंबईतील नुसता चहा- कॉफी, दिल्लीतील चाय टाऊन या कंपन्यांनीही उडी घेतली. शिवाय नागपूरच्या व्यावसायिकांनीही अमृत चहा, मस्का चहा, तंदूर चहा, टिक टॉक चहा, १ नंबर चहा मिळणारे दालन सुरू केले आहे.दालन सुरू केले आहे. ही दालने शहरातील विविध भागात वाढतच असून  विविध पद्धतींचा चहा पिण्याचा शौक असलेल्यांची गर्दीही वाढत आहे. सुमारे वर्षभरापूर्वी शहरात कुणाला घराबाहेर चहा प्यायचा असल्यास चहाची टपरी किंवा हॉटेल असेच निवडक विकल्प होते. परंतु आता शहराच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीचा व किमतीचा चहा उपलब्ध होत आहे.

पुन्हा कपात चहा

शहरातील निम्म्याहून अधिक चहाच्या टपऱ्यांसह हॉटेलमध्ये चहाच्या शौकिनांना काचेच्या ग्लासमध्ये चहा दिला जातो. परंतु या विविध ब्रांडेड कंपन्यांच्या दालनांमध्ये चहा कपात दिला जात आहे. त्यामुळे या चहाचा स्वाद जास्तच गोड लागत असल्याचे ग्राहक सांगतात. या दालनांमध्ये चहाशी संबंधित पुतळे व चहाशी संबंधित सौंदर्यीकरणासाठी वापरलेली युक्तीही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पारंपरिक हॉटेल्सला फटका

विविध ब्रांडेड चहा विक्रेत्यांच्या वाढत्या दालनांमुळे उपराजधानीतील पारंपरिक चहा विक्री करणारे हॉटेल्स आणि चहा टपऱ्यांवरील विक्री २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे या क्षेत्रातील विक्रेते सांगतात.