उपराजधानीत ब्रेड सुरक्षित असल्याचा अन्न व औषध प्रशासनाचा दावा

मॅगीने ग्राहकांचा विश्वास गमवल्यावर आता ‘ब्रेड’ हे खाद्य सर्वाच्या विचाराधीन आहे. ‘ब्रेड’मध्ये कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारे पोटॅशियम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडेट हे रासायनिक तत्व दिल्लीत आढळल्याचा धसका घेत नागपुरात ब्रेडच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दररोज होणाऱ्या विक्रीवर २० ते ३० टक्के परिणाम झाला आहे. दररोजच्या आवडीने खाण्यात येणाऱ्या ब्रेडने ग्राहकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकाला लावली असली तरी ‘नागपुरातील ब्रेड सुरक्षित’ असल्याचे दावा अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त एन.आर. वाकडे यांनी केला आहे.

सकाळच्या न्याहारीपासून ते रात्रीच्या जेवणात महत्त्वाचा घटक असणाऱ्या ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडेट हे दोन रासायनिक घटक काही प्रमाणात वापरण्याची परवानगी आहे. ५० पीपीएमपेक्षा त्याचे प्रमाण अधिक नसावे, असे मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूदही करण्यात आले आहे. मात्र शहरातील बेकऱ्यांमध्ये तयार होणाऱ्या ब्रेड मध्ये हे प्रमाण कमी असल्याचा दावा बेकरी चालकांनी केला आहे. शहरात अधिकृत बेकरींची संख्या ५४ आहे. दररोज सहा ते आठ लाखांची उलाढाल ब्रेड व्यवसायातून होत असते. यामध्ये ब्रेड, पाव, बन पाव, डोनट, पिझ्झा बेस अशा विविध खाद्य पदार्थाचा समावेश आहे. नागपुरात तयार होणारा ब्रेड उत्तम दर्जाचा असल्याचे बेकरी चालकांचे मत आहे. परंतु, ग्राहकराजा मात्र नेमका कोणावर विश्वास ठेवावा या संभ्रमात अडकला आहे.

स्थानिक ब्रेड सवरेत्कृष्ट

नागपुरात तयार होत असलेला ब्रेड सवरेत्कृष्ट आहे. पोटॅशयम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडेट हे रासायनिक तत्व आरोग्यासाठी घातक असून, ते ब्रेडमध्ये मोठय़ा प्रमाणात वापरण्यात येत असल्याची आरोळी दिल्लीच्या एका ‘एनजीओ’ने ठोकली मात्र तिचा आवाज केवळ दिल्लीमध्येच घुमला. यापूर्वी देखील त्याच संस्थेने अशाच प्रकारे दुसऱ्या खाद्य पदार्थाबाबत अनेकांना तो पदार्थ खावा की नाही याबाबत संभ्रमात टाकले होते. ब्रेडचे नमुने दिल्लीतील होते नागपुरातील नाही त्यामुळे यात घाबरण्यासारखे काही नाही. आपण मागील अनेक वर्षांपासून बेकरीच्या व्यवसायात आहे. त्यामुळे ‘भारतीय अन्न सुरक्षा’ कायद्यानुसारच आम्ही ब्रेडची निर्मिती करतो. नागपुरातील ब्रेड सर्वात सुरक्षित आहे. या वृत्तामुळे ब्रेड विक्रीवर थोडा परिणाम जाणवतो मात्र मागणी कमी झालेली नाही.

– अजित दिवाडकर, बेकरी चालक

 

शक्यता नाकारता येत नाही

ज्या प्रमाणे दिल्ली येथील ब्रेडच्या नमुन्यांमध्ये पोटॅशियम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडेट हे रासायनिक तत्व आढळून आले ते नागपुरातील ब्रेड मध्येही असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ब्रेड टिकवण्यासाठी व मऊ राहण्यासाठी त्यात रासायनिक घटकांचा उपयोग केला जातो. यामध्ये सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे. हलक्या दर्जाचे ब्रेड कुणी विकत घेऊ नये. मात्र पूर्वी प्रमाणे ज्या दर्जाचे ब्रेड बाजारात मिळत होते तो दर्जा आजच्या ब्रेड मध्ये राहिलेला नाही हे नक्की.

– शांतीलाल कोठारी, आहार संशोधक

 

कारवाईचा विषयच नाही

ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडेट हे रासायनिक घटक ५० पीपीएम पर्यंत वापरण्याची कायद्यात तरतूद आहे. अद्याप या घटकांवर देशात बंदी नाही. दिल्लीत यावर र्सवकष निर्णय घेण्यात येणार आहे. आम्हाला अद्याप कोणतेच निर्देश विभागामार्फेत मिळाले नाहीत. शिवाय आमच्या विभागातर्फे नियमित तपासणी अहवालानुसार नागपुरातील ब्रेड सुरक्षित असल्याने कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही.

एन.आर. वाकडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध विभाग.