18 September 2020

News Flash

विधि क्षेत्राशी विद्यापीठाचे जुनेच ऋणानुबंध

 १९२३ मध्ये स्थापन झालेल्या नागपूर विद्यापीठाला मोठा गौरवशाली इतिहास आहे.

|| देवेश गोंडाणे

सरन्यायाधीशांच्या उपस्थितीने आठवणींना उजाळा

नागपूर : ९६ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा उद्या शनिवारी आयोजित १०७ वा दीक्षांत सोहळा सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीने ऐतिहासिक ठरणार आहे. विधि क्षेत्राशी विद्यापीठाचे तसेच जुनेच ऋणानुबंध आहेत. नागपूर विद्यापीठाला याआधी पाच न्यायमूर्तीनी कुलगुरू म्हणून सेवा दिली तर पाच दीक्षांत सोहळ्याला भारत सरकारचे माजी महाधिवक्ता आणि देशातील विविध न्यायालयांच्या न्यायमूर्तीनी उपस्थित राहत विद्यार्थ्यांना दिशा आणि न्यायाचा मार्गही सांगितला आहे. मात्र, सरन्यायाधीश या सोहळ्याला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.

१९२३ मध्ये स्थापन झालेल्या नागपूर विद्यापीठाला मोठा गौरवशाली इतिहास आहे. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंहराव, ज्ञानयोगी दिवंगत श्रीकांत जिचकार अशा अनेक रत्नांनी नागपूर विद्यापीठाच्या खाणीतून जन्म घेतला. याच विद्यापीठातून १९७८ मध्ये विधिशाखेची पदवी घेतलेले सरन्यायाधीश शरद बोबडे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे माध्यम समन्वयक डॉ. श्याम माधव धोंड याबाबत माहिती देताना म्हणाले, सरन्यायाधीश उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असली तरी नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला याआधीही विधि क्षेत्रातील न्यायमूर्तीची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली आहे. भारताचे माजी महाधीवक्ता एम.सी. शेतलवाड यांनी १९५५ साली ३५ व्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित होते. विशेष म्हणजे, ९०,९१ आणि ९२ व्या दीक्षांत सोहळ्याला सलग तीन वर्षे न्यायमूर्ती प्रमुख अतिथी राहिले आहेत. यासह विद्यापीठाचे कुलगुरूंचे पदही अनेक न्यायमूर्तीनी भूषवले आहे. यात १९४४ ते ४७ या काळात न्यायमूर्ती वा.रा. पुराणिक, १९५६ ते ५९ या काळात न्या. श्री. के. मंगलमूर्ती, १९५९ ते ६२ मध्ये कर्नल न्या. जी.बी. बडकस, १९६२ ते६४ मध्ये कर्नल न्या. एस.पी. कोतवाल, १९६४ ते ६६ या काळात न्यायमूर्ती पी.पी. देव यांचा समावेश आहे. यात आणखी विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्र हा सी.पी.अ‍ॅण्ड बेरार मधून वेगळा होण्याआधी म्हणजे १९६०पूर्वी विद्यापीठामध्ये कुलसचिवांसह ट्रेझरर म्हणून पद असायचे. १९४७ ते १९५६ या काळात बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी विद्यापीठामध्ये ट्रेझरर म्हणून सेवा दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 1:01 am

Web Title: brighten up the memories with the presence of the chief justice akp 94
Next Stories
1 विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शालेय परिवहन समिती सक्रिय हवी
2 वीज दरवाढीची झळ बसू नये म्हणून प्रयत्न
3 अपघातमुक्त रस्त्यांसाठी ‘व्हीएनआयटी’ प्रशिक्षण देणार
Just Now!
X