बंदिस्त असलेले प्राणी स्थानांतरित करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी
उपराजधानीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या विस्तारित बृहत आराखडय़ाला (रेस्क्यू सेंटर) केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) मान्यता दिल्यानंतर आता या ठिकाणी प्राणी आणण्याच्या हालचालींला वेग आला आहे. वनखात्यात विविध ठिकाणी बंदिस्त असलेल्या वाघ, बिबट, काळवीट, चितळ, सांबार यांना गोरेवाडा प्राणिसंग्रहालय व बचाव केंद्रात स्थानांतरित करण्यासंबंधीचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांनी प्राधिकरणाची मान्यता मिळण्याच्या दोन दिवस आधीच काढले होते. त्यानंतर प्राणिसंग्रहालयाला मान्यता मिळाल्याने या आदेशाच्या अंमलबजावणीला चांगला वेग आला आहे.
वनखात्यातील अनेक जखमी वन्यप्राण्यांना महाराजबाग प्राणिसंग्रहालयाने आश्रय दिला आहे. ली, जान आणि चेरी नावाचे जुनोना येथे आईपासून दुरावलेले बछडे अवघे एक-सव्वा महिन्याचे असताना महाराजबाग प्राणिसंग्रहालयाने त्यांना आसरा दिला. या तीनपैकी पाच ते सहा वर्षांच्या एका वाघाला इतरत्र हलवण्यात आले, तर उर्वरित दोन मादी वाघिणींना गोरेवाडा प्राणिसंग्रहालय व बचाव केंद्रात स्थानांतरित करण्यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी.एस.के. रेड्डी यांना देण्यात आले आहेत.
जुनोना परिक्षेत्रातील कक्ष क्र. ४८४ मध्ये जेरबंद मादी बिबटय़ाला स्थानांतरित करण्यासंदर्भात वनविकास महामंडळाच्या उत्तर चंद्रपूर प्रदेशाच्या महाव्यवस्थापकांना, मोहर्ली रोपवाटिकेतील दोन मादी बिबटय़ांना स्थानांतरित करण्यासंदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक गरड यांना आदेश देण्यात आले आहेत.
ब्रम्हपुरीतील अस्थायी रोपवाटिकेतील मादी व नर बिबटसंदर्भात चंद्रपूरच्या प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांना तसेच अमरावती जिल्ह्यातील वडाळी अपंगालयातील दोन नर बिबटय़ासंदर्भात अमरावतीचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांना आदेश देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त रामटेक येथील मृगविहारात असलेले तीन नर काळवीट व चार मादी काळवीट, तीन नर चितळ व चार मादी चितळ, तीन नर सांबर व चार मादी सांबार यांना प्राणिसंग्रहालयात स्थानांतरित करण्यासंदर्भात नागपूरचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक टी.एस.के. रेड्डी यांना आदेश देण्यात आले आहेत.
या वन्यप्राण्यांना स्थानांतरित करण्यापूर्वी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य तपासणी करूच कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करण्यासंदर्भातही श्री भगवान यांनी आदेश दिले आहेत.