News Flash

दलालांची रेल्वे आरक्षणात घुसखोरी सुरूच

ऑनलाईन तिकीट विक्री असल्याने गैरव्यवहाराला थारा नाही.

भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच ऐतिहासिक कामगिरी करत विक्रमी उत्पन्न नोंदवले आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात रेल्वेने विविध माध्यमातून १.६८ लाख कोटी रूपये कमावले आहेत.

रेल्वेच्या आरक्षित तिकीट विक्रीतील गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक पळवाटा बंद करण्याचा प्रयत्न केला असला तरी दलालांनी तंत्रज्ञानालाही हुलकावणी देत तिकिटाचा काळा बाजाराचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. सर्वसामान्य प्रवाशांना ऑनलाईन किंवा खिडकीवरून ‘कन्फर्म’ तिकीट मिळणे कठीण झाले आहे.

ऑनलाईन तिकीट विक्री असल्याने गैरव्यवहाराला थारा नाही. रेल्वेचे तिकीट ‘प्रथम यावे प्रथम प्राप्त करावे’ या तत्त्वावर उपलब्ध होते, असा सर्वसामान्य जनतेचा समज आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. शहरातील कोणत्याही तिकीट आरक्षण केंद्रावर तिकीट काढण्यासाठी जा. तिकीट खिडकी उघडली आणि पहिले तिकीट मिळाले, असे कधीच होत नाही. केव्हाही गेले तरी खिडकीसमोर एक-दोघे उभे असलेले दिसेल. यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता. याचे गुपित पुढे आले. प्रत्येक आरक्षण केंद्रावर दलालांची पाच ते सहा जणांची टोळी कार्यरत असते. त्यांच्यापैकी एकजण तिकीट खिडकीवर कायम उभा असतो किंवा खिडकीसमोर इतर कोणी उभा राहणार नाही याची काळजी घेत असतो. खिडकीसमोरील पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीकडून प्रत्येकी सहा म्हणजे बारा ‘बर्थ’वर खरेदी केले जातात. यातील बहुतांश ‘बर्थ कन्फर्म’असतात. त्यानंतर तिकीट घेणाऱ्यांना ‘वेटिंग’चे तिकीट मिळते. ते कधी ‘कन्फर्म’ होईल की नाही, याची शाश्वती नसते. एका व्यक्तीला एक तिकीट आणि एका तिकिटावर सहा ‘बर्थ’ देण्याचा रेल्वेचा नियम आहे. तिकीट विक्री करताना आणि गाडीत बसल्यावर एका तिकिटासाठी एका प्रवाशाचे ओळखपत्र तपासण्याची पद्धत आहे. या नियमांचा दलाल लाभ घेत आहेत आणि एका तिकिटावर सहा ग्राहकांकडून पैसे कमवत आहेत. प्रत्येक ‘बर्थ’मागे तिकीट भाडे आणि २०० रुपये आकारले जाते. या व्यवहारासाठी ग्राहकांचे ओळखपत्र वापरले जाते. यासाठी तिकीट खिडकीसमोर दिवसभर, रात्री दलालांची ‘डय़ुटी’ लावली जाते.

रेल्वे तिकीट विक्रीतून दलाली कमावण्याचा दुसरा प्रकार थोडा खर्चिक आणि तंत्रज्ञानाशी निगडीत आहे. नागपुरातील रेल्वे तिकीट विक्री करणाऱ्यांना एजन्टला कोणत्या मार्गावर किती, कोणत्या दिवशी रेल्वेगाडय़ा धावतात, त्या रेल्वेगाडय़ांना कोणत्या शहरासाठी किती ‘बर्थचा कोटा’ आहे. याचा चांगला अभ्यास असतो. सर्वसाधारण प्रवासी नागपूर ते मुंबई, नागपूर ते दिल्ली, नागपूर ते चेन्नई, नागपूर ते हैदराबाद, नागपूर ते पुणे असे तिकीट खरेदी करीत असतो. परंतु काटोल, कामठी किंवा वरोरा, भंडारा या रेल्वे स्थानकासाठी काही गाडय़ांचा कोटा निश्चित केलेला आहे. हे त्याला माहिती नसते. मात्र दलालाकडे यासंदर्भातील सर्व माहिती असते. त्यामुळे ते जो रेल्वे स्थानक आधी असेल तर तेथून तिकीट खरेदी करतो आणि बोर्डिग नागपूर येथून दाखवतो. यामुळे कन्फर्म तिकीट मिळण्याचे प्रमाण वाढते. या युक्तीचे ते प्रवाशाकडून २०० ते ५०० रुपये अधिक रक्कम घेत असतात.

पाच ते सहा युवकांनी मिळून शहरातील वेगवेगळ्या रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर अक्षरश अतिक्रमण केले आहे. शहरात रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळण्याचे सहा ठिकाण आहेत. नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर पूर्व आणि पश्चिम प्रवेशद्वार दोन, अजनी, इतवारी रेल्वे स्थानक, मोतीबाग येथे लांब पल्ल्याच्या आरक्षित तिकीट मिळतात. यातील कोणत्याही तिकीट विक्री केंद्रावर चोवीस तास कुणी ना कुणी तिकीट खरेदीसाठी रांगेत लागलेला असतो.

‘तिकीट खिडकीवर एकच व्यक्ती येत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यासाठी नागपूर, अजनी रेल्वे सुरक्षा दलास सूचना करणार आहे.’’

ज्योतिकुमार सतिजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 1:13 am

Web Title: brokers issue in railway reservation
Next Stories
1 विवाह मंडपातूनच निघाली अंत्ययात्रा
2 नागपूरमध्ये किरकोळ वादातून मुलाने केला वडिलांचा खून
3 खासगी दवाखाने व तपासणी केंद्र बंद
Just Now!
X