अशोकाबुद्धिस्ट मायनॉरीटिज मल्टिपरपज सोसायटीचा उपक्रम

पोलिसांसह इतर अनेक खात्यांतील रिक्त पदांसाठी विविध परीक्षा उपराजधानीत होतात. पैकी बाहेरगावच्या गरीब उमेदवारांकडे पैसे नसल्यास त्यांना रस्त्यांवर उपाशी झोपावे लागते. काही भिक्खूंनी अशोका बुद्धिस्ट मायनॉरिटिज मल्टिपरपज सोसायटीच्या माध्यमातून या उमेदवारांना मदतीचा हात दिला आहे. देणगीच्या पैशातून ही सोसायटी या उमेदवारांच्या मोफत राहण्या-खाण्याची सोय कुंजीलालपेठेतील बोधीवृक्षनगरातील विहारात करते.

भन्ते हर्षदीप आणि भन्ते अभय यांनी काहींना सोबत घेत समाजातील गरजूंच्या मदतीसाठी अशोका बुद्धिस्ट मायनॉरीटिज मल्टिपरपज सोसायटी स्थापन केली. ही सोसायटी गेल्या अनेक वर्षांपासून अपघातामध्ये जखमी व्यक्ती, रंजल्या-गांजल्यांच्या सेवा करण्यापासून तर चिमुकल्यांवर योग्य संस्कार करत आहे. समाजात अनेक अनाथ गरीब मुले शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना आर्थिक मदत केली जाते. शिक्षणच नाही तर मुलांसाठी बुद्धविहारात लायब्ररी, संस्कार केंद्र, भिक्?खू निवासाची सोयही सोसासटीकडून कुंजीलालपेठेतील विहारात केली जाते. येथे दानावर जगणारे भंते अनाथ मुलांना पुस्तकांचे दानही येथे करत आहेत. गेल्या चार वर्षांत सात्त्विक विचारातून अनेक मुलांच्या पालनपोषणासह शिक्षणाचा खर्चही येथे केला गेला.

अनाथांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा सर्व खर्च करण्यासाठी भदन्त हर्षदीप सदैव पुढे असतात. कुंजीलालपेठेतील बोधीवृक्षनगरात संस्थेने संस्कार केंद्र सुरू केले. त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन येथे होते. याशिवाय कोण्या एखाद्या मुलावर शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज पडल्यास मदत केली जाते. मेडिकल, सुपरमधील डॉक्?टरांशी संपर्क साधून मदत केली जाते. उपराजधानीत २१ ते २८ मार्चला लोहमार्ग पोलिसांतील विविध पदांकरिता शारीरिक चाचणी परीक्षा झाली. त्यात भुसावळ, वाशीम, बुलढाणा, सोलापूरपासून तर अमरावती, गडचिरोली येथील अडीचशे मुले आले होते. त्यातील अनेकांजवळ जेवणाची सोय नसल्याचे भन्ते हर्षदीप आणि भन्ते अभय यांच्या लक्षात आले. सोसायटीच्या माध्यमातून मानवाधिकार संरक्षण मंच तसेच परिवर्तन मंचचे कार्यकर्ते भन्ते बुद्धघोष, नंदवर्धन राऊत, शैलेश वानखेडे, सिद्धार्थ बनसोड, जयंत भगत, संदीप वाघमारे, आशीष चवरे, मंगेश डोंगरे यांच्यासह सर्वच तरुणांना विहारात बोलावले. दोनशे ते अडीचशे मुलांच्या दोन वेळच्या जेवणाची तसेच निवासाची सोय येथे करण्यात आली. तब्बल आठ दिवस ही सेवा केली गेली.

ऑटोरिक्षा चालकांची मदत

उपराजधानीत नित्याने विविध खात्याच्या परीक्षा होतात. पहिल्यांदा शहरात या परीक्षेसाठी आलेल्या गरीब मुलांची भेट प्रथम रेल्वेस्थानक किंवा एसटी बसस्थानकावरील ऑटोरिक्षा चालकांशी होते. त्यामुळे बऱ्याच ऑटोरिक्षा चालकांना या उमेदवारांना थेट सोसासटीकडून मदत केली जाणाऱ्या कुंजीलालपेठेतील बुद्ध विहारात आणण्याची  विनंती केली आहे. येथे येणाऱ्या बऱ्याच उमेदवारांचे भाडेही सोसायटीकडून दिले जाते. वर्षांला या पद्धतीने सुमारे १०० उमेदवारांना मदत केली जाते.

– भन्ते अभय नायक, नागपूर.

गरिबांना रक्त मिळवून देण्यासाठी चमू

‘‘अशोका सोसायटी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून देण्यापासून तर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचे काम करत आहे. प्रामाणिक तरुण मुलांची साथ मिळत असल्यानेच हे शक्य आहे. मेडिकल, सुपरमध्ये गरिबांवर उपचार होतात. अनेक अत्यवस्थ रुग्णाला वेळेवरच रक्ताची गरज भासते. सोसायटीचे सदस्य चमूतून या रुग्णांपर्यंत पोहोचतात. तातडीने रुग्णाला आवश्यक असलेल्या रक्तासाठी एक देणगीदार मिळवून सहज नि:शुल्क रक्त उपलब्ध केले जाते. रुग्णालयात रक्त नसल्यास बाहेरून रक्त खरेदीसाठीही मदत केली जाते.’’

– भन्ते हर्षदीप, कुंजीलालपेठ, नागपूर.