नितीन गडकरींची राज्य सरकारला सूचना;  बुटीबोरीतील उड्डाणपूल, विमा रुग्णालयाचे भूमिपूजन

नागपूर : पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बुटीबोरी क्षेत्रात ५ हजार घरे बांधून हा परिसर झोपडपट्टीमुक्त करा. तेव्हाच इथे नवीन उद्योग येतील, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला केली. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाअंतर्गत व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (एन.एच.ए.आय.) बुटीबोरी एम.आय.डी.सी. चौकातील प्रस्तावित उड्डाणपूल व विमा रुग्णालयाच्या भूमिपूजनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय श्रम व रोजगार राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोषकुमार गंगवार, पालकमंत्री,चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने , खासदार डॉ. विकास महात्मे व आमदार समीर मेघे उपस्थित होते.

गडकरी पुढे म्हणाले,  रेमंड कंपनीच्या आदर्श विद्यालयाची (मॉडेल स्कूलची) स्थापना बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात झाल्यास येथील कामगारांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल. याकरिता जागेच्या उपलब्धतेसाठी राज्यशासनाने प्रयत्न करावेत. बुटीबोरी-हिंगणा या औद्योगिक भागाचे नगर परिषदामध्ये रूपांतर झाल्यामुळे या क्षेत्रात अनेक उद्योग येत आहेत. वध्र्यापासून नागपूर, काटोल, रामटेक या गावांना जोडणारी ब्रॉडग्रेज मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याचा करार रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये उद्या होणार आहे. त्यानुसार, मेट्रोरेल्वेचे कोच बनवण्याचा कारखाना बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात स्थापन केला जाणार आहे. यामुळे येथील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होतील. या क्षेत्रात अभियांत्रिकी, तंत्रनिकेतनची महाविद्यालये उभारून आवश्यक मनुष्यबळ तयार करणे ही प्राथमिकता असली पाहिजे. बुटीबोरी-हिंगणा क्षेत्रातील कामगाराच्या आरोग्यविषयक समस्या, निवास व्यवस्था, पेयजल तसेच महामार्गाजवळच्या अतिक्रमणाच्या समस्यांच्या निराकरणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत. राज्य कामगार विमा महामंडळाच्या सुमारे १८० कोटी रुपयांच्या तरतुदीने बांधले जाणारे हॉस्पिटल हे या क्षेत्रासाठी वरदान असून खासगी हॉस्पिटल सारख्या चांगल्या वैद्यकीय सुविधा येत्या काळात कामगारांना मिळतील. बुटीबोरी उड्डणपुलाचे काम न्यायालयीन स्थगितीमुळे रखडले होते, परंतु स्थानिक आमदार समीर मेघे यांच्या पाठपुराव्याने आता उड्डाणपुलाच्या कार्यातील सर्व अडचणी दूर झाल्या असून ८५० मीटर लांबीच्या उड्डाणपुलासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दीड महिन्यात प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

या भागातील महामार्गावरील उड्डाणपूल, कामगारांसाठी आवास व्यवस्था या मागण्या प्रलंबित होत्या, त्या आता पूर्णत्वास जात आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. विदर्भ मराठवाडय़ातील एम.आय.डी.सी. ना छत्तीसगडपेक्षा १० पैसे कमी प्रति युनिट दराने वीज उपलब्ध करून दिल्याने उद्योग या विभागाकडे वळत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बुटीबोरी येथे राज्य परिवहन मंडळातर्फे बांधल्या जाणाऱ्या बसस्थानकाचे भूमिपूजनही याप्रसंगी करण्यात आले. यावेळी एन.एच.ए.आय.चे क्षेत्रीय अधिकारी चंद्रशेखर, ई.एस.आय.सी.चे आयुक्त कटारिया, राज्य परिवहन मंडळाचे उपमहाव्यवस्थापक पंचभाई, जि.प.अध्यक्ष निशा सावरकर, आमदार मल्लिकार्जून रेड्डी उपस्थित होते.

रघुजीनगरातील रुग्णालय आता ईएसआयसी अंतर्गत

ई.एस.आय.सी.च्या वतीने देशभरातील ३०० जिल्हयात रुग्णालये कार्यरत असून त्यातील १६ महाराष्ट्रात आहेत. राज्यशासन व ई.एस.आय.सी. या दोघांच्या संयुक्त प्रयत्नांतून या रुग्णालयांचा कारभार चालत असतो, असे सांगून नागपुरातील रघुजीनगर येथील रुग्णाल हे ई.एस.आय.सी. मार्फत चालवले जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय श्रम व रोजगार राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोषकुमार गंगवार यांनी केली.