25 September 2020

News Flash

बसस्थानकावरील ऑटोचालकांमध्ये टोळीयुद्ध

परिसरात प्रत्येक प्रवाशामागे दलाली मिळवण्यासाठी काही गुंडांचाही शिरकाव झाला आहे.

प्रवासी बसवण्याच्या वादातून खुनाचा प्रयत्न

गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ऑटोचालक व खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांसाठी प्रवासी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या टोळ्या तयार झाल्या आहेत. आता परिसरात टोळीयुद्ध भडकत असून मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एका ऑटोत प्रवासी भरण्याच्या वादातून ऑटोचालकावर चाकूने हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्यापही फरार आहेत.

दिनेश सखाराम गाडगे (४८) रा. बजरंगनगर असे जखमीचे नाव आहे. राकेश कुदेशी (२८) रा. विश्वकर्मानगर आणि शुभम (२५) रा. सोमवारी क्वॉर्टर, सक्करदरा अशी आरोपींची नावे आहेत. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून राज्य महामंडळासह विविध कंपन्यांच्या खासगी बसगाडय़ा चालतात. येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या परिसरात प्रत्येक प्रवाशामागे दलाली मिळवण्यासाठी काही गुंडांचाही शिरकाव झाला आहे. परिसरात दारूची तस्करीही मोठय़ा प्रमाणात होते. गणेशपेठ परिसरातील गुन्हेगारीची दखल घेऊन उच्च न्यायालयाने जनहित याचिका दाखल करून घेतली. पण, विशेष उपाययोजना करण्यात आल्या नाही.

१४ सप्टेंबरला सायंकाळी दिनेश बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून प्रवासी शोधत होता. त्यावेळी आरोपीही तेथे प्रवासी भरण्यासाठी पोहोचले. त्यांच्यात वाद झाला. सोमवारी सायंकाळी पुन्हा ते समोरासमोर आले असता आरोपींनी दिनेशला भोसकले. परिसरातील लोकांनी चौकात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिनेशला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

यापूर्वी पोलिसांवरही हल्ला

रस्त्यावर वेडेवाकडे वाहन उभे करणाऱ्या ऑटोंवर जामर कारवाई करण्यासाठी गेलेल्या दोन वाहतूक पोलिसांवर फेब्रुवारी २०१९ मध्ये ऑटोचालकांनी हल्ला करून जखमी केले होते. याप्रकरणी सोनू कांबळे रा. बेलतरोडी व मयूर राजूरकर रा. रामबाग या ऑटोचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली होती. परिसरात दिवसेंदिवस ऑटोचालकांची  मुजोरी वाढत असून स्थानिक रहिवासी व प्रवासीही त्रस्त आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 3:02 am

Web Title: bus stand auto driver murder police fight akp 94
Next Stories
1 मोहित पीटर खुनातील चौघांना जन्मठेप
2 अधिकृत घोषणेपूर्वी प्रथमच निवडणूक तयारी
3 खासगी प्रयोगशाळेच्या हितासाठी चुकीच्या अहवालाची भीती!
Just Now!
X