तरुणाई भरकटलेली, तरुणाई बिघडलेली, अशी ओरड सर्वत्र होत असली तरीही हीच तरुणाई जेव्हा नवी पिढी घडविण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेते, तेव्हा मात्र हीच तरुणाई कौतुकास पात्र ठरते. मायेचे छत्र हरपलेल्या, घरापासून दुरावलेल्या अशा या हजारो चिमुकल्यांसाठी ही तरुणाई देवदूत बनून आली आहेत. वेगळ्या वाटेवर जाण्यापूर्वीच त्यांचे आयुष्य योग्य दिशेने घडवतानाच यातील कित्येकांना या तरुणाईने विदेशाची वाटही मोकळी करून दिली आहे.

अनाथालयातील या मुलांना शिक्षणाचा गंध फारसा लाभत नाही आणि लाभला तरीही तो किती काळासाठी असेल, याचीही शाश्वती नसते. त्यामुळे कित्येकदा त्यांचे आयुष्य उमलण्यापूर्वीच कोमेजण्याची शक्यता अधिक. या पिढीचे आयुष्य भरकटण्यापासून सावरण्यासाठी आणि अक्षरगंधाबरोबरच करिअरचे उत्तुंग शिखर गाठण्यासाठी या तरुणाईने हात पुढे केला. ही तरुणाई महाविद्यालयात शिकणारीही आहे आणि नोकरीच्या वाटेवर असणारीसुद्धा. पूर्णवेळ या चिमुकल्यांना आपण देऊ शकत नाही, हे त्यांनाही ठावूक आहे म्हणूनच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी ते या मुलांना शिकवण्यासाठी जातात. प्रत्येकाने पाच मुलांची जबाबदारी वर्षभरासाठी स्वीकारलेली असून गणित, इंग्रजी, विज्ञान, असे वेगवेगळे विषय ते शिकवतात. विशेष म्हणजे, कुठल्याही अनुदानावर ही संस्था जगत नाही, तर उगवत्या पिढीचे आयुष्य घडविण्यासाठी ते स्वत: घरोघरी जाऊन रद्दी जमा करतात, गरब्याच्या कार्यशाळा घेतात व दिवाळीत दिव्यांचे स्टॉल्स लावतात. अशा विविध उपक्रमांतून पैसे गोळा करून ते पुस्तकांपासून तर सर्व शैक्षणिक साहित्य खरेदी करतात. वेगवेगळ्या पद्धतीने दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे ही चिमुकलेही शनिवार आणि रविवारची वाट बघत असतात. या मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, उत्सुकता आहे आणि शिक्षणासाठी ते तेवढेच गंभीरसुद्धा आहेत.  म्हणूनच त्यांचे ज्ञानार्जन वाढवण्यापासून तर त्यांच्या करिअर निश्चितीसाठी स्वयंसेवकांच्या रूपातील ही तरुणाई सातत्याने कार्यरत असून त्याचे सकारात्मक परिणामसुद्धा समोर यायला लागले आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणात ही मुले एवढी तयार झाली आहेत की, यातील काही अमेरिकेतील स्कॉलरशिपसाठी पात्र ठरली आहेत.

नागपुरात सहा केंद्रे

तीन केंद्रांपासून सहा वषार्ंपूर्वी नागपुरात सुरुवात झाली आणि आज तब्बल सहा केंद्रे आहेत. या प्रत्येक केंद्रांची वेगवेगळी वैशिष्टय़े आहेत. सीताबर्डीवरील मातृसेवा संघात विकलांग मुले असल्यामुळेच या मुलांना शिकवणारे स्वयंसेवकसुद्धा त्यांचे दुप्पट कौशल्य पणाला लावतात. स्वयंसेवक आणि चिमुकल्यांमध्ये एक वेगळेच बंध तयार झाले आहेत. मातृसेवा संघाशी संलग्न धरमपेठेतील बालसदनमध्येही ४० मुले आहेत. माहिती आणि जाणून घेण्याची जिज्ञासा असणारी ही मुले अ‍ॅनिमेशन चित्रपट, स्पोर्टस् कारपासून सर्व विषयांवर संवाद साधतात. कित्येकदा त्यांच्यात फुटबॉलचे सामनेही होतात. शरणस्थान येथेही ३० मुले असून गाणी, नृत्य आणि चित्रकलेत निपूण आहेत. त्यामुळे शिक्षकही शिकवणीदरम्यान किंवा नंतरही त्यांच्यासोबत त्यांच्या आवडत्या गाण्यांवर नृत्य करतात आणि गाणीसुद्धा गातात. ‘होम फॉर होप’ या संस्थेत सगळ्याच मुली असून सातत्याने इंग्रजीतून संभाषणाचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे स्वयंसेवकांच्या रूपातील तरुणाईसुद्धा त्यांना प्रोत्साहित करते. ‘युवाज्योती’मध्येही ३६ मुले आहेत. गोधनी येथेही विल्किन्सन केंद्रात सुमारे १०० मुले आहेत.

देशभर हजारो तरुणाई

जगभरात जाळे पसरलेल्या ‘मेक अ डिफरन्स (मॅड) या संस्थेत अशी हजारोंच्या संख्येने तरुणाई काम करते. भारतात कोचिनपासून याची सुरुवात झाली आणि तब्बल २३ केंद्रे भारतात सुरू झाली. याच त्रिवेंद्रम, मंगलोर, विजयवाडा, लखनऊ, कोचिन, बंगळुरू, वायजॅक, दिल्ली, कोईम्बतूर, गुंटूर, नागपूर, देहराडून, म्हैसूर, हैदराबाद, चंदीगड, भोपाळ, वेल्लोर, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, पुणे, ग्वाल्हेर या शहरांचा समावेश आहे. त्यात तब्बल ४५०० स्वयंसेवकांच्या रूपातील तरुणाई काम करत आहे. नागपुरातील सहा केंद्रात २४५ मुले आणि सुमारे २०० स्वयंसेवक त्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी कार्यरत आहेत.