‘कॅन किड्स, किड्स कॅन’ संस्था; महागडी औषधे, भोजन, प्रवास तिकिटांसाठीही मदत

संपूर्ण राज्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत असून त्यांच्यात बालकांचीही संख्या मोठी आहे. या दुर्धर रोगाने मरणयातना भोगणाऱ्या मुलांच्या वेदना पालकांना बघवत नाही. त्यातच गरिबी असल्यास उपचारासाठी पैसा नसतो. अशा कर्करोगग्रस्त मुलांना मदतीचा हात देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)मध्ये गेल्या पाच वर्षांपासून ‘कॅन किड्स, किड्स कॅन’ ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडे औषधे, भोजन, प्रवास तिकिटांकरिता पैसे नसल्यास आर्थिक मदत केली जाते.

या रुग्णांच्या उपचाराकरिता खर्चही खूप लागतो. त्यातील गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना दिलासा देण्याकरिता शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शासनाकडून या नागरिकांच्या आरोग्य विमाचे हप्ते संबंधित विमा कंपन्यांकडे भरण्यात येतात. त्यातून या रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयांत मोफत उपचार व शस्त्रक्रिया होतात. परंतु राज्यातील रहिवाशी नसलेल्या व शिधापत्रिका नसलेल्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या संवर्गातील बाल कर्करुग्णांच्या पालकांकडे उपचाराकरिता पैसे नसल्यास मुलाच्या वेदना बघण्याशिवाय पर्याय नसतो. या रुग्णांना आधार देण्याकरिता मेडिकलमध्ये ‘कॅन किड्स, किड्स कॅन’ ही संस्था २०१२ च्या सुमारास उदयास आली.

सण, उत्सव, सहलीतून वेदनेवर फुंकर

खेळण्याचे वय असलेल्या या बालकांना कर्करोगासारखी व्याधी जडल्याने प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे या मुलांचे चेहरे कायमच कोमेजलेले दिसतात. डोळ्यात अश्रू ही तर नित्याचीच बाब होऊन जाते. या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी ‘कॅन किड्स, किड्स कॅन’ या संस्थेकडून मेडिकलमध्ये प्रशासनाच्या मदतीने दरवर्षी होळी, दिवाळी, नवीन वर्षांचा शुभारंभ, प्रत्येक मुलाचा वाढदिवस आणि इतरही सण साजरे केले जातात. मुलांकरिता शहरातील विविध निसर्गरम्य ठिकाणांवर संस्थेकडून सहलीही आयोजित केल्या जातात. या लहान- सहान उपक्रमांतून मुलांनाही काही काळ वेदनांचा विसर पडून मनसोक्त आनंद लुटता येतो. या सर्व कार्यक्रमांमध्ये कर्करोग विभाग आणि मेडिकलचे वार्डही सजवले जातात.

वर्षांला ५०० बाल कर्करुग्णांना लाभ

मेडिकलमध्ये प्रत्येक वर्षी १०० ते १२५ बाल कर्करुग्णांची नोद होत असून सर्वाधिक रुग्ण हे रक्ताच्या कर्करोगाचे असतात. या रुग्णांसह मेडिकलमध्ये जुन्या इतर ४०० रुग्णांवर उपचार होतात. या सर्व ५०० रुग्णांना ‘कॅन किड्स किड्स कॅन’ या संस्थेकडून मदतीचा होत देऊन त्यांचे आत्मिक बळ वाढविण्यास मदत केली जाते.

शुभेच्छा पत्रक तयार करण्याचे प्रशिक्षण

संस्थेकडून बाल कर्करुग्णांना दिवाळी व इतर सणांचे शुभेच्छा पत्रक तयार करण्यासह क्राफ्टशी संबंधित प्रशिक्षण दिले जाते. ही शुभेच्छा पत्रके मुलांच्या हाताने मेडिकलध्ये त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेट म्हणून दिली जातात. या उपक्रमातून डॉक्टर आणि बाल कर्करुग्णांमध्ये प्रेमाचे ऋणानुबंध स्थापन होण्यास मदत होते. अशा ऋणानुबंधातूनच डॉक्टर म्हणजे केवळ इंजेक्शन देणारी व्यक्ती ही भावना मुलांच्या मनातून निश्चितच हद्दपार होते.

बाल कर्करुग्णांच्या उपचाराकरिता संस्थेची निर्मिती

कॅन किड्स, किड्स कॅन’ची स्थापना दिल्लीतील पूनम बगाई यांनी केली आहे. त्यांना कर्करोग झाल्यावर त्यांनी यशस्वी उपचारातून या आजारावर विजय मिळवला. या काळात त्यांनी प्रचंड वेदना सहन करत इतर रुग्णांचेही दुख बघितले. या आजाराच्या ० ते २० वयोगटातील मुलांनाही उपचार घेता यावा म्हणून त्यांनी ही संस्था स्थापन करत मदतकार्य सुरू केले. या संस्थेला अमेरिकेतील टेक्सास येथील डॉ. विनय जैन यांच्या ‘जीवन दया’ या संस्थेकडूनही मदत केली जाते. ‘कॅन किड्स, किड्स कॅन’चे भारतात ४६ केंद्रे आहेत. नागपूरच्या रुग्णांच्या मदतीसाठी ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. क्रिष्णा कांबळे यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.

वैशाली गोमारे, कॅन किड्स, किड्स कॅन, समाजसेवा अधीक्षक, नागपूर