विद्यार्थ्यांना फटका, संताप

राज्य शासनाच्या महापालिका प्रशासकीय संचालनालयातर्फे करनिर्धारण अधिकारी,लेखापाल आणि अभियंता पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान वाडीतील स्किल मॅट्रिक्स सव्‍‌र्हिसच्या केंद्रावर  तांत्रिक बिघाड  झाल्याने  विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.

वाडी भागातील स्किल मॅट्रिक्स सर्व्हिसेसच्या संगणक कक्षांमध्ये आज दोन वेगवेगळ्या परीक्षा होत्या. पहिली परीक्षा करनिर्धारण अधिकारी पदासाठी १२.३० वाजता होती, तर दुसरी परीक्षा दुपारी चार वाजता लेखापाल  आणि अभियंता पदांसाठी होती. सकाळी ११ वाजता परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांचे ‘लॉग इन’ होत नव्हते. तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थी संतापले. परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने कंपनीच्या मालकाने तेथून काढता पाय घेतला. आयोजकांपैकी कोणीही  जबाबदार व्यक्ती नसल्याने विद्यार्थी सैरभैर झाले होते. त्यांनी घोषणा दिल्या. याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. दरम्यान, परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे कर्मचारी व अधिकारी केंद्रावरून निघून गेले होते. आज रद्द झालेली परीक्षा ३१ तारखेला होणार असल्याचे तहसीलदार टकले यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

केंद्र बंद करण्याची मागणी

क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असल्याने आणि तांत्रिक मदत पुरवणाऱ्या कंपनीला सिस्टीम हाताळता न आल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. यापूर्वी ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’च्या परीक्षेतही विद्यार्थ्यांचा असाच गोंधळ झाला होता. त्यावेळी दोन पेपरमध्ये विद्यार्थ्यांना केवळ दहा मिनिटांचा वेळ मिळाला होता. याठिकाणी विद्यार्थ्यांची सोय होत नाही, तांत्रिक माहिती असलेले अभियंते नाहीत तर अशा केंद्रांवर परीक्षा ठेवून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी का खेळले जाते, असा संतप्त प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित करीत केंद्र बंद करण्याची मागणी केली.

तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे लॉग इन होऊ शकले नाही. कारण सिस्टीममध्ये व्हायरस गेल्याने ही समस्या उद्भवली. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. परीक्षेदरम्यान काही तांत्रिक अडचण आल्यास शासन पुनर्परीक्षा घेते. त्यामुळे याबाबतीतही शासन पुनर्परीक्षा घेण्याची शक्यता आहे.

– चैतन्य ढमढेरे, प्रमुख, स्किल मॅट्रिक्स सव्‍‌र्हिसेस, वाडी