एक लाख लोकसंख्येमागे ९५ नवीन रुग्णांची भर; तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयाचा अभ्यास

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयाने केलेल्या अभ्यासात नागपुरातील प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ९० ते ९५ कर्करुग्ण प्रत्येक वर्षी स्त्री व पुरुष या दोन्ही संवर्गात नव्याने आढळून येत असल्याचे पुढे आले आहे. त्यात महिलांची संख्या जास्त असून एकूण कर्करुग्णांतील ५० टक्के रुग्णांच्या आजाराचे कारण हे तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन आहे.

देशात सर्वाधिक कर्करुग्ण मिझोरम (प्रत्येक लाखात २७०) येथे आढळले. नागपुरात सध्या प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ९० पुरुष तर ९५ महिलांना कर्करोगाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. पुरुषांमध्ये मुखाशी संबंधित कर्करोगाचे प्रमाण जास्त असून महिलांमध्ये मात्र स्तन व गर्भाशय कर्करुग्णाचे प्रमाण जास्त आहे. शहरात पुरुषांमध्ये मुखाचा कर्करोग हा १५.७ टक्के तर महिलांमध्ये गर्भाशय कर्करोग हा १३.५ टक्के आहे. त्यानंतर पुरुषांमध्ये जिभेचा कर्करोग हा ८ टक्के तर महिलांमध्ये मुख कर्करोग ५.१ टक्के आहे. नागपुरात ६९.५ टक्के पुरुषांना व ४५ टक्के महिलांना तंबाखूच्या सेवनामुळे हा आजार जडल्याचे प्राथमिकदृष्टय़ा स्पष्ट होत असल्याचा दावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रुग्णालयाने केला आहे. या रुग्णालयाच्या नोंदीनुसार येथे १ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत चार वर्षांत २ हजार ५२१ पुरूष तर २ हजार ५३५ महिलांमध्ये कर्करोग आढळला.

त्यात तंबाखूच्या कारणामुळे होणाऱ्या पुरुष संवर्गातील रुग्णांची टक्केवारी ६० टक्के तर महिलांची टक्केवारी २२.६ टक्के होती. मुखाच्या कर्करुग्णांत पुरुषांची संख्या २०.९ टक्के, जिभेच्या कर्करुग्णांत ९.६ टक्के, ओठाच्या कर्करुग्णांत ०.९ टक्के आढळली, तर महिलांमध्ये मुखाच्या कर्करुग्णांत ८.१ टक्के, जिभेच्या कर्करुग्णांत ३.४ टक्के तर ओठांच्या कर्करुग्णांत ०.३ टक्के जणांना हा आजार असल्याचे पुढे आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयासह देशातील निवडक संस्थेत कर्करुग्णांची अधिकृत नोंद होते. त्याच्या आकडेवारीवरून पुरुषांच्या तुलनेत महिलांना हा आजार अधिक असल्याचे स्पष्ट होते. हा अभ्या स आणखी सूक्ष्म स्तरावर करण्याकरिता प्रत्येक रुग्णाची नोंद होणे गरजेचे आहे. हा आजार बरा होवू शकतो, परंतु तातडीने रुग्णाने उपचार घेण्याची गरज आहे.

डॉ. पंकज चौधरी, संचालक, तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालय, नागप