भाजप, काँग्रेसमध्ये सर्वाधिक

गेल्या काही वर्षांपासून राजकारणाचे गुंडगिरीकरण झाले असून निवडणूक काळात सर्रासपणे गुंडांचे माध्यमातून मतप्रभावित करून विजय मिळविण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत, परंतु हल्ली गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे लोकच राजकारणात प्रवेश करीत असून राजकीय पक्षही त्यांना उमेदवारी जाहीर करते. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीतही गुन्हेगारी पाश्र्वभूमी असणाऱ्या अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये असे कलंकित उमेदवार असून स्वच्छ प्रतिमेचा पक्ष म्हणून समाजात मिरवणाऱ्या भाजप व काँग्रेस पक्षात त्यांची संख्या सर्वाधिक आहे.

राजकारण आणि गुंडगिरी यांचे जवळचे नाते आहे. निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी राजकीय पुढारी परिसरातील गुंडांशी हातमिळवणी करीत असल्याचे अनेक दाखले आहेत. राजकीय पुढाऱ्यांच्या जोरावर वस्तीत गुंडगिरी करणारेही अनेकजण असतात, परंतु आता गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्येही गुंड म्हणवून घेण्यापेक्षा राजकीय पुढारी म्हणवून घेण्याची महत्त्वाकांक्षा जागृत झाली असून अनेकांनी महापालिकेत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यात काहींना यश आले, तर काहींच्या पदरी निराशा पडली. याशिवाय राजकारणातील अनेक दिग्गजांचीही पाश्र्वभूमी ही गुन्हेगारी असल्याचे निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत जोडण्यात आलेल्या शपथपत्रातून स्पष्ट होते.

यात स्वच्छ प्रतिमेचा पक्ष म्हणून समाजात मिरविणाऱ्या भाजपमध्येही अनेक उमेदवारांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे. अनेकांवर राजकीय आंदोलनांचे गुन्हे दाखल आहेत, तर काहींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. राजकीय आंदोलनादरम्यान बेकायदा जमाव गोळा करणे, तोडफोड करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांमध्ये महापौर व भाजपचे उमेदवार प्रवीण दटके, भाजपचे उमेदवार संदीप जोशी, शरद पडोळे, संजय बंगाले, प्रदीप पोहणे, रवींद्र भोयर, प्रकाश भोयर, प्रगती पाटील, देवेंद्र मेहर यांचा समावेश आहे, तर दयाशंकर तिवारी यांच्याविरुद्ध फसवणूक, व्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारणे, विश्वासघात करणे, नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांच्यावर बेकायदा एकत्र येणे, पुतळ्याची विटंबना करणे, धार्मिक भावना दुखावणे आदी गुन्हे दाखल आहेत. भाजप समर्थित बरिएमंचे उमेदवार नागेश गोविंदराव सहारे यांच्यावर तोडफोड करणे, खंडणी मागणे यासारखे गंभीर गुन्हे आहेत.

काँग्रेसच्या नेत्यांवरही अशाप्रकारचे गुन्हे दाखल असून हरीश मोहन ग्वालबंशी, नितीश ग्वालबंशी, अनिल रविशंकर पांडे, धरमपाल देवराव पाटील, किशोर गजभिये, अनिल महादेव वाघमारे, प्रशांत रामराव धवड, पुरुषोत्तम नागोराव हजारे, तोयसिफ अब्दुल वहीद अहमद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पाटील, पांडे, गजभिये यांच्यावर फसवणुकीचा, तर धवड यांच्यावर बंदी बनवून ठेवणे असे गुन्हे दाखल आहेत. पुरुषोत्तम हजारे यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे आणि इतर गुन्हे दाखल आहेत. त्यांना काही दिवसांसाठी पोलिसांनी तडीपारही केले होते, तर काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील, कमलेश दिलीप चौधरी, प्रशांत ढाकणे, बंटी शेळके यांच्यावर तोडफोड करणे, बेकायदा जमाव गोळा करणे आदी स्वरूपाचे गुन्हे आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्यांच्या शपथपत्रात एकही गुन्हा दाखल नसल्याचे नमूद केले आहे हे विशेष. शिवसेनेच्या अल्का दलाल यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तर भाजपातून सेनेत आलेले नील माधवराव धावडे यांच्याविरुद्ध खंडणी मागणे, हत्या करणे यासारखे अतिशय गंभीर गुन्हे आहेत. राष्ट्रवादीचे जगदीश ग्वालबंशी यांच्यावर फसवणूक व विश्वासघात करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

बाल्या बोरकर यांच्यावर सर्वाधिक १६ गुन्हे

महापौर प्रवीण दटके, माजी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी यांच्याविरुद्ध शासकीय कामात हस्तक्षेप करणे, सरकारी मालमत्तेची तोडफोड करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर बाल्या बोरकर यांच्याविरुद्ध तब्बल १६ गुन्हे दाखल असून त्यात अ‍ॅट्रॉसिटी आणि धार्मिक विटंबणेच्या गुन्ह्य़ाच्या समावेश आहे. रवींद्र भोयर यांच्याविरुद्ध ४ गुन्हे, अनिल धावडेविरुद्ध एकूण ११ गुन्हे आणि दयाशंकर तिवारी यांच्यावर एकूण ७ गुन्हे दाखल आहेत.

जात बारई, प्रवर्ग बीसीसी!

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांचे शपथपत्र संकेतस्थळावर टाकताना निवडणूक आयोगाकडून गोंधळ सुरू आहे. सुरुवातीला आयोगाकडून उमेदवारांचे उत्पन्न डॉलरमध्ये दाखविण्यात आले होते, तर शिक्षण बी.ए. असे नोंदविण्यात आले. या चुका दुरुस्त केल्यानंतर आता इतर मागास प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांच्या शपथपत्रात ‘ओबीसी’ असा उल्लेख करण्याऐवजी ‘बीसीसी’ असा उल्लेख आहे. अनेक उमेदवारांची जात कुणबी, तेली, बारई, धोबी असून त्यांचा प्रवर्ग ‘बीसीसी’ नोंदविण्यात आला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोंधळ कायम आहे.