झुलेलाल इन्स्टिटय़ूटमध्ये गोंधळ

नागपूरच्या झुलेलाल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी या केंद्रावर रविवारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सहाय्यक तांत्रिक (मेकॅनिकल) या पदाच्या परीक्षेदरम्यान एक तास विलंबाने प्रश्नपत्रिका मिळाल्याने व त्या उघडय़ा लिफिाफ्यातून आणल्याने संतप्त उमेदवारांनी ही परीक्षाच उधळून लावली.

सहाय्यक मेकॅनिक या पदासह विविध पदांकरिता महामंडळाने इच्छुक उमेदवारांची रविवारी राज्यभरात लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षा घेण्याची जबाबदारी मुंबईच्या ‘आर्सिस इन्फोटेक’ या कंपनीकडे सोपवण्यात आली होती. नागपूरात या परीक्षेसाठी एकूण चार केंद्र होती व ३,४७५ उमेदवारांनी त्यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी झुलेलाल इन्स्टिटय़ूटच्या केंद्रावर गोंधळ झाला. सकाळी ११.३० ते १ अशी परीक्षेची वेळ होती. एक तासापूर्वी केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना उमेदवारांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नागपूरच्या बोखारा रोड, लोनारा येथील झुलेलाल इन्स्टिटय़ूटमध्ये सुमारे १२०० उमेदवार पोहचले. केंद्राच्या द्वारावर आसनक्रमांकानुसार खोल्यांच्या नियोजनाचा तक्ता लावला नव्हता. काही खोल्यांमध्ये टेबलवर आसन क्रमांकही टाकलेले नव्हते. परीक्षा सुरू झाल्यावरही दोन वर्गात पर्यवेक्षक नव्हते. एक तास उलटल्यावरही प्रश्नपत्रिकाच मिळत नसल्याने उमेदवर संतापले. त्यानंतर  खुल्या लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला. हा पेपर आधीच फुटला असल्याची शंका त्यांना होती. त्यामुळे संतप्त उमेदवारांनी पेपर न सोडवताच बाहेर पडून इतर वर्गातील उमेदवारांच्या प्रश्नपत्रिका हिसकावण्याचा प्रयत्न केला.

[jwplayer apj5cKTw]

परीक्षेत घोळ असल्याचे निदर्शनात येताच सगळ्याच उमेदवारांनी वर्गातील खुर्चा- टेबल भिरकावत इन्स्टिटय़ूटच्या बाहेर केंद्राच्या बाहेर निदर्शने केली.  दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत बंदोबस्त वाढविला. दरम्यान एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीही केंद्रावर येऊन दोन दिवसांत परीक्षेबाबत योग्य निर्णय घेण्याचे व याची माहिती महामंडळाच्या संकेतस्थळावर टाकण्याचे आश्वासन उमेदवारांना दिले.

केंद्रात २१ एवजी केवळ १९ पर्यवेक्षक

परीक्षेकरीता झुलेलाल इन्स्टिटय़ूटमध्ये २१ खोल्यांमध्ये उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक खोलीत १ या प्रमाने येथे २१ परीक्षक(इन्विजिलेटर)नियुक्त करण्याची गरज असतांना १९ जणांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे हा गोंधळ उडाला. हा गंभीर प्रकार असल्यामुळे शासनाकडून दोषींवर कारवाई होणार काय? हा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित होत आहे.


दोन दिवसांत निर्णय- सुधीर पंचभाई

झुलेलाल इन्स्टिटय़ूटच्या केंद्रावर एसटीच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष प्रश्नपत्रिकांचे सील तोडण्यात आले. त्यामुळे पेपर फुटल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या परीक्षेची जवाबदारी खासगी कंपनीला दिली होती. त्यांचा प्राथमिक स्वरूपात दोष दिसून येते. दोन दिवसांत या बाबत केंद्रीय कार्यालय निर्णय घेईल.

-सुधीर पंचभाई, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नागपूर</strong>