लक्षणांमुळे डॉक्टरांनाही धडकी

नागपूर : दुबईहून आलेल्या एका करोना संशयित रुग्णाला आज शनिवारी  मेडिकल येथे दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाला ताप, सर्दी, खोकला अशी करोना संसर्गाची लक्षणे असल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही धडकी भरली आहे.

नागपूरचा ४१ वर्षीय रुग्ण १८ फेब्रुवारीला दुबईला गेला होता. तो २५ फेब्रुवारीला दुबईतून विमानाने  नागपुरात परतला.  त्याला गेल्या पाच दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला आहे.  नातेवाईकाकडून ही माहिती मेडिकलला कळवताच त्याला तातडीने येथे दाखल करण्यात आले. त्याचे नमुने राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या मेयोतील शाखेत पाठवण्यात आले आहेत. मेडिकलचे डॉक्टर त्यावर उपचार करत आहेत. इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे  आहे. मेडिकल प्रशासनानेही या वृत्ताला दुजोरा दिला. या रुग्णाच्या नमुन्यांच्या तपासणी अहवाल आल्यावरच  नेमक्या आजाराची माहिती स्पष्ट होईल. यापूर्वी मेडिकलला दाखल केलेल्या चारही रुग्णाचे नमुने निगेटिव्ह आले होते.

 ‘डायलर टोन’वर जनजागृती

शनिवारी सकाळपासून कुठल्याही व्यक्तीला संपर्कासाठी भ्रमनध्वनी केल्यास करोनाच्या जनजागृतीचा ध्वनी ऐकू येत आहे. त्यापूर्वी पुढची व्यक्ती खोकलत असल्याचा आवाज येत असल्याने जणू ही व्यक्ती आजारीच असल्याचा भास होतो. नंतर ही जनजागृती असल्याचे कळले. महाराष्ट्रात मराठीत ही जनजागृती अपेक्षित असताना इंग्रजी आणि हिंदी भाषेतच ती केली जात आहे.

विदेशी प्रवाशांची संख्या घटली

उपराजधानीत आखाती देशातून रोज एक किंवा दोन विमाने येतात. करोनाच्या भीतीने या विमानातील  प्रवाशांची संख्या निम्याहून जास्त कमी झाल्याचे  विमानतळावरील स्क्रिनिंगवरून पुढे येत आहे.