अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

गणेशपेठ पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शिवीगाळ करणारे भाजपचे नेते व नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्याविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तिवारी यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली असून, त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे. जामिनाच्या काळात तिवारी यांना १५ व १७ सप्टेंबरला सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

तिवारी यांनी त्यांच्या प्रभागातील दोन युवकांना गस्तीवर असलेल्या पोलीस शिपायांनी मारहाण केल्याबद्दल आणि पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याबद्दल जाब विचारला होता. या मुद्दांवरून त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली होती व त्यातून त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली होती. ही घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमाराची होती. यासंदर्भातील चित्रफित व्हायरल झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले होते. राजकीय दबावामुळे सोमवारी दिवसभर गुन्हा दाखल झाला नव्हता. हे प्रकरण माध्यमांत आल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दरम्यान, गुन्हा दाखल होणार याची चाहूल लागताच दयाशंकर तिवारी आणि कमलेश नायक यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश कुळकर्णी यांच्यासमक्ष तिवारी यांच्या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. दरम्यानच्या काळात तिवारी आणि नायक यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात दररोज सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान हजेरी लावावी लागणार आहे.

गणेशपेठ पोलीस ठाण्यात रविवारी रात्री हंगामा करणाऱ्या तिवारी आणि त्यांचे सहकारी नायक यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे (३५३), सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांतता भंग करणे (२९४), बेकायदेशीररित्या लोकांना एकत्रित करणे (१४५), शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यवाही करण्यापासून रोखणे (१८६) आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांची मालमत्ता घेण्यापासून रोखणे (१८३) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिवारी यांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांची बाजू अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, रोहिनी खापेकर यांनी, आशीष नाईक यांची अभिमन्यू समर्थ यांनी मांडली.

राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्याच शहरात त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी पोलिसांना शिवीगाळ केली. त्यामुळे पोलीस काय भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. तिवारींवर गुन्हा दाखल झाल्याने भाजपमध्येही खळबळ उडाली आहे.