पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेला ब्रम्होस एअरोस्पेसचा तत्कालीन वरिष्ठ अभियंता निशांत अग्रवालचे प्रकरण लखनऊ न्यायालयाने नागपूर न्यायालयात वर्ग केले आहे. दरम्यान, निशांत अग्रवालने जामिनासाठी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला असता या प्रकरणात दाखल करण्यात आलेले दस्तावेजच दोषारोपपत्र असून स्वतंत्र दोषारोपपत्राची आवश्यकता नसल्याने त्याचा जामीन नामंजूर करण्यात आला.

भारत आणि रशिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रम्होस एअरोस्पेसचे मुख्यालय नागपुरात आहे. या ठिकाणी निशांत अग्रवाल वरिष्ठ यंत्रणा अभियंता पदावर कार्यरत होता. त्याला लखनऊच्या दहशतवादी विरोधी पथकाने गेल्या ८ ऑक्टोबर २०१८ ला पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला अतिसंवेदनशील दस्तावेज दिल्याचा ठपका ठेवून अटक केली होती.  तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन ९० दिवस उलटल्यानंतरही एटीएसने दोषारोपपत्र दाखल न केल्याने निशांतला कायद्यानुसार जामीन देण्यात यावा, अशी विनंती करणारा अर्ज प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे करण्यात आला. त्या अर्जावर न्यायदंडाधिकारी जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या जामिनाला विरोध करताना एटीएसने काही दस्तावेज सादर केले. एटीएसच्या म्हणण्यानुसार लखनऊच्या विशेष प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे एक तक्रार सादर करण्यात आली आहे. ती तक्रारच दोषारोपपत्र असल्याचा दावा करण्यात आला.

यावेळी एटीएसने तक्रारीत म्हटले आहे की, निशांतला नागपुरातील त्याच्या भाडय़ाच्या घरातून अटक करण्यात आली. त्याने फेसबूक, लिंकडीन आणि गुगलच्या माध्यमातून काही महिलांशी संवाद साधला. मात्र महिलांची  ती खाती बनावट होती.  निशांतने अनधिकृतपणे ब्रम्होसचे काही संवेदनशील दस्तावेज स्वत:जवळ बाळगले होते. ब्रम्होसचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. देव यांच्याकडून प्राप्त पत्रानुसार, निशांतकडे सापडलेले दस्तावेज बाळगण्याचा त्याला अधिकार नाही. ते दस्तावेज अतिशय संवेदनशील व गोपनीय असून देशाच्या सुरक्षेसाठी अतिमहत्त्वाचे आहेत. ब्रम्होस सोडून पीएच.डी. करण्यासाठी कॅनडा येथे निघून गेलेल्या अ‍ॅलेन एम. अब्राहम यांच्या संगणातून निशांतने त्यांच्याही नकळत हे दस्तावेज मिळवले होते. त्याने नेहा शर्मा, पूजा रंजन आणि सेजल कपूर नामक तिघींशी संवाद साधला. सेजल कपूरशी संवाद साधताना तिने इंग्लंडमधील नागरी विमान क्षेत्रात संधी असल्याचे सांगितले. निशांतने या क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली व वैयक्तिक माहिती पाठवली. त्यावेळी तिने निशांतसंदर्भात आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून ते त्याच्याशी संपर्क करतील, असे सांगितले.  त्याला ‘एक्स ट्रस्ट’ या लिंकवर संवाद साधण्यासाठी बोलावण्यात आले. संवाद अपूर्ण राहिल्याने त्याने पुन्हा सेजलशी संवाद साधला असता ‘क्यु-व्हीस्पर’ ही लिंक पाठवण्यात आली. ती लिंकही मध्येच बंद झाली. त्यानंतर ‘हायन२७२’ ही लिंक डाऊनलोड करून पूर्वीच्या दोन्ही लिंक वगळण्यास सांगितले, असे निशांतने आपल्या कबुली जबाबात म्हटले आहे. पण, तो नेहा शर्मा व पूजा रंजन यांच्याशी संवाद साधण्यामागचे कारण सांगू शकला नाही. निशांतविरुद्ध पुरेसे पुरावे असून त्याला जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती एटीएसने केली. एटीएसचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन नाकारला. निशांतर्फे अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांनी बाजू मांडली.