विनापरवाना खोदकामामुळे सरदार पटेल चौकातील वाहतुकीला अडथळा

मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांच्या कामांमुळे शहरातील रस्ते खड्डय़ात आहेत की, रस्त्यांवर खड्डे आहेत हे समजायला मार्ग नाही. अशात ‘ओसीडब्ल्यू’कडून विनापरवानगी खड्डे खोदले जात असल्याने नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांना पूर्वकल्पना न देता ‘ओसीडब्ल्यू’ने सरदार वल्लभभाई पटेल चौकापासून रस्ता खोदण्यास सुरुवात केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी थेट कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शहरातील एकही रस्ता खड्डय़ाविना नाही. मेट्रो, सिमेंट रस्त्याच्या कामामुळे आणखी अडचण झाली आहे. ज्या ठिकाणी कामे सुरू नाहीत, त्या ठिकाणचे रस्ते आधीच खराब झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना वाहन चालविणे कठीण झाले. यात ‘ओसीडब्ल्यू’च्या कामाची भर पडली. काही दिवसांपूर्वी कंपनीने वाहतूक विभागाला पूर्वकल्पना न देताच इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खड्डे खोदले. सरदार पटेल चौकातून कॉटन मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन वर्षांपासून पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे परिसरात आधीच कोंडी होते. नागरिकांना त्रास होऊ नये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून वाहतूक चेंबर-३ चे एक पथक नियमित त्या परिसरात असते, परंतु रस्त्यांवर खड्डे खोदून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने वाहतूक पोलिसांची दमछाक होते. त्यामुळे वाहतूक चेंबर-३ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी इमामवाडा पोलिसांत तक्रार दिली. इमामवाडा पोलिसांनी ‘ओसीडब्ल्यू’विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला.

पोलीस आयुक्तांकडून दखल

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम हे गेल्या महिन्यात इमामवाडा परिसरातून जात असताना रस्त्यांवर खोदकाम करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी ‘ओसीडब्ल्यू’विरुद्ध गुन्हा दाखल केला.

विनापरवानगी रस्त्यांवर खड्डे खोदणे किंवा परवानगीमधील अटी व शर्तीनुसार खड्डे न बुजवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता खोदण्यापूर्वी वाहतूक विभागाकडून पूर्वपरवानगी घेऊन कामे करावीत आणि अटी व शर्तीचे पालन करावे. लोकांना मन:स्ताप आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल.

– अशोक बागुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक चेंबर-३