05 August 2020

News Flash

सदरमध्ये गोवंश कत्तलीचा गोरखधंदा जोरात

दोन वर्षांपासून पोलिसांकडून एकदाही कारवाई नाही

दोन वर्षांपासून पोलिसांकडून एकदाही कारवाई नाही

नागपूर : शहराच्या मध्यभागी असलेल्या आणि जुनी लोकवस्ती असणाऱ्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गड्डीगोदाम परिसरात गोवंश कत्तलीचा गोरखधंदा जोमात सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी गोवंश तस्करी विरोधात एकदाही कारवाई करण्यात आली नाही. यावरून येथील कत्तलखान्यांना अप्रत्यक्षपणे सदर पोलिसांचा आशीर्वाद तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांची पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलीस आयुक्त कार्यालयापासून पाचशे मीटर अंतरावर कुख्यात गुंडाचा मटका चालत असून गड्डीगोदाम परिसरात चार ते पाच ठिकाणी मटका खेळला जातो. त्याशिवाय रेल्वे लाईनवर जुगार खेळला जात असून काही दिवसांपूर्वी जुगाराच्या वादातून एकाच्या खुनाचा प्रयत्नही झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

आता गड्डीगोदाममध्ये मोठय़ा प्रमाणात गोवंश कत्तल व तस्करी केली जाते. दोन वर्षांपूर्वी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त असताना राकेश ओला यांनी गड्डीगोदाम परिसरात गोवंश कत्तलीवर कारवाई केली होती. त्यावेळी जवळपास २०० जनावरांची सुटका करण्यात आली. तेव्हा जवळपास सहा महिने परिसरातील गोवंश कत्तल व तस्करीचा व्यापार बंद होता. पण, आता तेथे पूर्ववत व्यापार सुरू असून पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. यावरून अप्रत्यक्षपणे सदर पोलिसांच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा सुरू असल्याची बाब स्पष्ट होते.

या ठिकाणी साठवतात गोवंश

या परिसरात नझीम तनवीर हा गोवंशच्या तस्करीसाठी ओळखला जातो. त्याच्याशिवाय इतरही व्यापारी तेथे मोठय़ा प्रमाणात गोवंशाचा व्यवसाय करतात. गड्डीगोदामच्या चौकापासून आत महापालिकेची बंद पडलेली लाल शाळा आहे. या शाळेत गोवंश साठवून ठेवले जाते. याच ठिकाणी ओला यांनी कारवाई करून २०० गोवंशाची सुटका केली होती.

योग्य ती कारवाई करू

गड्डीगोदाम परिसरात गोवंश कत्तल व तस्करीचे काम होत असेल तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशाप्रकारचा कोणताही व्यवसाय चालू देण्यात येणार नाही.

– विनीता शाहू, पोलीस उपायुक्त, परिमंडळ -२.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 4:30 am

Web Title: cattle slaughter in nagpur sadar area with blessing of the police zws 70
Next Stories
1 ‘मोबाईल गेम’मुळे पतंग विक्री थंडावली
2 शहरातील ‘वॉटर एटीएम’मध्ये कॅनचा ठणठणाट
3 मेट्रोचा वेग वाढला, पण प्रवाशांचा ओघ कमीच
Just Now!
X