महेश बोकडे

करोनाच्या कठीण काळात मेडिकल, मेयो, एम्ससह इतरही शासकीय रुग्णालयांत सर्व अत्यावश्यक औषधांसह तपासणींच्या सुविधा उपलब्ध केल्याचा दावा शासनासह स्थानिक प्रशासन करते. परंतु पंधरा ते वीस दिवसांपासून येथे बाधितांसाठी आवश्यक मार्कर तपासण्यांसह रक्ताची साधी सीबीसी तपासणी किट्स संपल्यामुळे बंद झाली आहेत. कंत्राटदाराचे देयक थकल्याने त्याने या किट्सचा पुरवठा बंद केला आहे.

नागपूरच्या मेडिकलमध्ये विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेशातून अत्यवस्थ रुग्ण उपचाराला येतात, तर येथील हृदय, मूत्रपिंड, पोटाशी संबंधित आजाराच्या अत्यवस्थ गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांसाठी सुपरस्पेशालिटी हे एकच शासकीय रुग्णालय आधार आहे. येथेही कुणी रुग्ण आल्यास उपचाराची दिशा ठरवण्यासाठी डॉक्टर प्रथम रक्ताची सीबीसी तपासणी करतात. तर करोनाबाधितांची प्रकृती अत्यवस्थ असल्यास काही महागडय़ा मार्कर तपासण्याही करणे आवश्यक असते. परंतु दोन्ही तपासणीसाठीच्या किट्स, अथवा रसायन सध्या या रुग्णालयांत संपले आहेत. त्यामुळे या तपासण्याच ठप्प झाल्या आहेत.

दरम्यान, शासनाने करोनावर नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात कृती दल तयार करत त्यातील अधिकाऱ्यांना वेळोवेळी रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही नागपूरच्या मेडिकल, येथील कोविड रुग्णालय, सुपरस्पेशालिटी रुग्णालयात ही अवस्था असल्याने त्यांच्या कामावरही विविध सामाजिक संघटना प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, सध्या मेडिकल, येथील कोविड रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयांत एका कंत्राटदाराने त्यांचे रसायन घेण्याच्या अटीवर सीबीसी तपासणी करणारे यंत्र लावून दिले आहे.

या कंत्राटदाराकडून रसायनही माफक दरात दिले जाते. परंतु गेल्या एक ते दीड वर्षांपासून या कंत्राटदाराचे सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे देयकच दिले गेले नाही. त्यामुळे या रसायनाचा पुरवठा कंत्राटदाराने थांबवला आहे. परंतु या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यात कोणत्याही अधिकाऱ्यांना रस नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

खासगी प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ वार्डात

मेडिकल, येथील कोविड रुग्णालय, सुपरस्पेशालिटी रुग्णालयांत कोणत्याही खासगी प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ दिसू नये म्हणून शासनाचे आदेश आहेत. परंतु सध्या येथे रक्ताच्या सामान्य सीबीसी तपासण्याही होत नसल्याने खासगी प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ थेट वार्डात रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीला घेण्यासाठी येत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. पैकी काही तंत्रज्ञ रुग्णांकडून तपासणीचे अवास्तव शुल्कही आकारत आहेत.

‘एक्स-रे’च्या फिल्मही नाही

मेडिकल, येथील कोविड रुग्णालय, सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सध्या एक्सरेच्या फिल्म संपल्या आहेत. मेडिकलला एचएमआयएस तंत्रज्ञान असल्याने येथील एक्सरे डॉक्टर विविध वार्डाच्या संगणकावर बघू शकतात. परंतु ही सोय सुपरस्पेशालिटीत नाही. त्यामुळे संगणकावरील चित्राचे मोबाईलवर छायाचित्रण करून डॉक्टरांना उपचाराची दिशा ठरवण्याची पाळी येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मेडिकलला रोज ५०० सीबीसी चाचण्या

‘मेडिकल’मध्ये सध्या रोज सुमारे ५०० रुग्ण, सुपरस्पेशालिटीत १५० तर येथील कोव्हिड रुग्णालयातही रोज पन्नासच्या जवळपास रुग्णांची सीबीसी तपासणी होते. तपासणी बंद असल्याने या रुग्णांना फटका बसत आहे, तर सध्या मेडिकलमध्ये सर्वाधिक १०७ करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मेडिकलच्या रुग्णांना एक्स-रे फिल्म दिली जात नसून तपासणीचा अहवाल थेट उपचार करणाऱ्या डॉक्टरांना एचएमआयएस या ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकावर बघता येतो. तर पोलीस नोंद असलेल्या रुग्णांनाच फिल्म वा सीडीत अहवाल दिला जातो. सीबीसी आणि काही तपासण्यांचे रसायन संपल्याने प्रशासनाकडून संबंधितांना खरेदीचे आदेश दिले गेले आहे. ते लवकरच मिळणार आहे. तेव्हापर्यंत काही प्रमाणात शिल्लक रसायनातून तपासणी होत आहे.

– जनसंपर्क विभाग, वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, मेडिकल.