ओजस खामेले ९९.४ तर आद्या पांडे ९९.२ टक्क्यांसह उत्तीर्ण

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) आज बुधवारी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालावर लक्ष टाकल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकेक गुणासाठी स्पर्धा दिसून आली. विशेष म्हणजे, नागपूर विभागातील विद्यार्थ्यांनी यावेळीही वर्चस्व कायम ठेवले. भवन्स विद्यामंदिर त्रिमूर्तीनगरचा विद्यार्थी ओजस खामेले याने ९९.४ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले.

उपराजधानित सीबीएसईच्या सुमारे ५० शाळा असून यातील जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये मॉडर्न स्कूल कोराडी रोडची आद्या पांडे ९९.२ टक्के तर भवन्स त्रिमूर्तीनगरचा विनील मोखाडे याने ९९ टक्के गुण मिळवले.

मागील वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थिनींनी निकालात बाजी मारली असली तरी विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनात गेल्यावर्षीच्या तुलनेत थोडी सुधारणा झाली. तसेच अनेक शाळांच्या कामगिरीतही प्रगती झाली व गुणवंतांची संख्या वाढली. त्यामुळे शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. नारायण विद्यालयाची नंदिनी कुलकर्णी, काटोल रोड सेंटर पॉईंट शाळेची अनुष्का शुभ्रमण्यम, भवन्स सिव्हिील लाईनची कृशी अग्रवाल व भवन्स त्रिमूर्ती नगरची कृती पाटील ९८.८ टक्क्यांनी उत्तीर्ण झाले.

‘आयआयटी’ प्रवेशाचे लक्ष्य – ओजस खामेले

मला सुरुवातीपासून बुद्धिबळाची आवड आहे. अनेक स्पर्धामध्ये सहभाग घेत त्या जिंकल्याही आहेत. याचा फायदा स्मरणशक्ती वाढण्यात झाला असून माझ्या या यशात खेळाचे फार महत्त्व असल्याचे भवन्स त्रिमूर्ती नगर येथील  झालेल्या ओजस खामेले याने सांगितले. आयआयटीला प्रवेश मिळवणे हे लक्ष्य असून त्यादिशेने प्रयत्न सुरू केल्याचे ओजस सांगतो. आपल्याला भविष्यात काय बनायचे आहे ही दिशा निश्चित करून त्या दिशेने प्रवास केल्यास यश गाठता येते, असा विश्वास ओजस व्यक्त करतो. दहावी हा आयुष्याला वळण देणार बिंदू असून नियोजनबद्ध अभ्यास हाच यशाचा मार्ग असल्याचेही त्याने सांगितले.