नववर्षांच्या उत्सवासाठी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहरात हजारांवर पोलीस तैनात करण्यात आले असून ३१ डिसेंबरच्या रात्री पोलीस आयुक्तांपासून ते पोलीस शिपायापर्यंत सर्वजण रस्त्यावर राहणार आहेत. बंदोबस्ताकरिता तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येणार असून दोन हजार १०१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.

नववर्षांच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी तयारी सुरू आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री शहरातील अनेक भागात तरुणाईच्या उत्साहाला उधाण येते. रात्रभर बार, रेस्टॉरेंट सुरू राहणार असून झिंगलेल्या तरुणाईमुळे सर्वसामान्य नागरिक व महिलांना त्रास होऊ नये, याची खबरदारी म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी अंबाझरी, फुटाळा, धरमपेठ, सीताबर्डी, हिंगणा, एमआयडीसी, वाडी, सोनेगाव या परिसरात प्रचंड गर्दी असते. त्यामुळे पोलिसांनी या भागातील सात पोलीस ठाण्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून त्या पोलीस ठाण्याकरिता पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस कर्मचारी देण्यात आले आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी अडीचशे कर्मचारी तैनात असतील. त्यांच्या हाती ३५ ब्रिथ अ‍ॅनालायझर आणि स्पीड गन असतील. झिंगलेल्या व बेधुंद तरुणाईच्या नियंत्रणासाठी रस्त्यांवर बॅरिकेटिंग राहणार आहे. यावेळी वेडीवाकडी वाहने चालवणारे आणि बुलेटमधून फटाके फोडणाऱ्यांची वाहने जप्त करून चालान कारवाई करण्यात येईल.

११५ हॉटस्पॉट

रस्त्यांवरील भांडणाकरिता शहरातील काही भाग अतिशय प्रसिद्ध आहेत. त्या भागातून नेहमी पोलीस नियंत्रण कक्षात हाणामारी व भांडणांचे दूरध्वनी येतात. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री त्या भागांमध्ये भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा ११५ भागांची पोलिसांनी यादी तयार केली असून त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची विशेष नजर असेल. शिवाय रात्रीच्या वेळी जमाव झाल्यानंतर त्यांना पांगवण्यासाठी थेट नियंत्रण कक्षातून लाऊडस्पीकरने आवाज देण्यात येईल. अशा ५६ ठिकाणी पोलिसांना नियंत्रण कक्षातून घोषणा करता येईल.

हुल्लडबाजी करू नये

नववर्षांचे स्वागत जल्लोषात करावे. मात्र, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची तरुणाई व नागरिकांनी काळजी घ्यावी. मद्य प्राशन करून वाहन चालवू नये. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. लोकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत राहणार असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चलचित्र रेकॉर्ड होणार असल्याने पोलिसांवर खोटे आरोप करता येणार नाही.

शिवाजी बोडखे, सहपोलीस आयुक्त.