वाहनांचे क्रमांक टिपण्यात अडचणी; पोलीस तपासाच्या दृष्टीनेही अपेक्षित परिणाम नाही

स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून चौकातील प्रत्येक हालचाल त्यात टिपण्यात येते. पण, रात्रीच्या अंधारात हे कॅमेरे बिनकामाचे ठरत आहेत. विशेष म्हणजे, अनेक गुन्हेगारी कृत्य रात्रीच घडत असल्याने पोलिसांच्या तसाकार्यातही या कॅमेऱ्यांचा अपेक्षित उपयोग होत नसल्याचे समोर आले आहे.

सेफ अ‍ॅण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ५२० कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी सव्‍‌र्हिलन्सचा प्रकल्प उभारला गेला. या प्रकल्पांतर्गत चारचाकी वाहने अन् स्मार्ट सिटी स्ट्रीटवरील दिवेही संचालित करण्यात येत आहेत.  सध्या शहरातील सातशे चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, परंतु मेट्रोचे काम, सिमेंटचे रस्ते आणि उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे ४० ठिकाणचे कॅमेरे काढण्यात आले. हा प्रकल्प महापालिका व पोलिसांतर्फे संचालित करण्यात येत आहे. त्यासाठी मनपात नियंत्रण कक्ष उभारले आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षात स्वतंत्र केंद्र निर्माण करण्यात येत आहे. आतापर्यंत शहरातील १०१४  कि.मी. परिसर कॅमेऱ्याच्या टप्प्यात आला आहे. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे आणि गुन्ह्य़ांचा तपास करण्यात होतो. पण रात्रीच्या अंधारात वाहन क्रमांक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंद होत नाही. शिवाय चालत्या वाहनांचे क्रमांक स्पष्टपणे दिसत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास घडणारे गुन्हे व अपघातांच्या तपासामध्ये पोलिसांसमोर अनेक अडचणी येत आहेत.

तीन लाखांवर वाहनचालकांना चालान

शहरात सिग्नल तोडणाऱ्या तीन लाखांवर वाहनचालकांना चालान पाठवण्यात आले. यातून मोठय़ा प्रमाणात दंड वसूल करतानाच काहींवर गुन्हेही दाखल करण्यात आले. शहर नियंत्रण कक्षातील कॅमेऱ्यातून हे सर्व बेशिस्त वाहनचालक टिपण्यात आले. चौकात लागलेल्या स्वयंचलित, ३६० अंशात फिरणारा कॅमेरा, सिग्नल तोडणाऱ्यांना टिपणारा कॅमेरा असल्याने शहर पोलिसांना मोठी मदत मिळत असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, पण त्यांनी आचारसंहितेमुळे नाव प्रकाशित करण्यास मनाई केली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे रात्रीच्या अंधारात काम करीत नसतील तर त्यावर लक्ष देण्यात येईल, असेही सांगितले.

कॅमेऱ्यांचे जाळे

  • कार्यरत कॅमेरे – ३,४०६
  • एकूण ऑनलाईन कॅमेरे – ३,२७०
  • बंद कॅमेरे – १३६
  • रस्ते, मेट्रो व इतरांमुळे काढलेले – २६८
  • फिक्स्ड कॅमेरे – २,३५०
  • पीटीझेड (पॅन टिल्ड झूम) – ६०२
  • मल्टीसेंन्सर कॅमेरे (बहुसंवेदन) – १०८
  • पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम (चौकातील एलईडी स्क्रीन) – ५६
  • ड्रोन कॅमेरे – ९५
  • एनपीआर (वाहन क्रमांक स्वयंचलित नोंद घेणारा)/आरएलव्हीडी (रेड लाइट व्हिडीओ डिटेक्शन) – ६२
  • मोबाईल सव्‍‌र्हिलन्स व्हॅन – पाच
  • ड्रोन – पाच

कॅमेऱ्याच्या मदतीने उलगडलेले गुन्हे

  • चोरी, वाहनचोरी, चेन स्नॅचिंग- १४
  • अपहरण- १४
  • हरवलेल्यांचा शोध – ४०
  • दरोडे – ६४
  • अपघात – १०८
  • खून- २४
  • तोतया पोलीस – आठ
  • बॅग पळवून नेणे – १३
  • गैरवर्तणूक – १७
  • फसवणूक – ०९
  • आग नियंत्रण – ०८
  • दंगल/ मारहाण – ३९