10 December 2018

News Flash

विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी मेडिकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक प्रणाली

विना परवानगी गैरहजर विद्यार्थ्यांवर कारवाई

प्रतिनिधिक छायाचित्र

विना परवानगी गैरहजर विद्यार्थ्यांवर कारवाई

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ७८ टक्के पदवीचे विद्यार्थी विविध तासिकांना गैरहजर राहत असल्याचे उघड झाल्यावर विद्यार्थ्यांची हजेरी वाढवण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्था करण्यात येणार आहे. गैरहजर विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय) दिल्लीच्या निकषानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांची वर्गात ठरावीक हजेरी अत्यावश्यक आहे. मात्र, पदवीचे ७८ टक्के विद्यार्थी विविध तासिकांना गैरहजर राहत असल्याचे उघड झाले. त्यावर प्रशासनाने विद्यार्थ्यांची हजेरी वाढवण्यासाठी एका तासिकेला गैरहजर राहिल्यास विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर काही प्रमाणात वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली, परंतु गैरहजर विद्यार्थ्यांचा टक्का अद्यापही अधिक आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक तासिकेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने आता सर्वच वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक हजेरीची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व यंत्रणा मार्च २०१८ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर प्रत्येक तासिकेवर प्रशासनाचे लक्ष असेल.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण वैद्यकीय अधीक्षक कार्यालय आणि विविध विभाग प्रमुखांकडे असेल. विद्यार्थी गैरहजर दिसताच तातडीने त्याला जाब विचारून त्यावर प्रसंगी कडक कारवाई केली जाईल.

त्यामुळे या प्रयोगातून मेडिकलच्या पदवीच्या सर्व तासिकांमध्ये हजेरी वाढण्याची प्रशासनाला आशा आहे.

सध्या पदवीचे विद्यार्थी नियमितपणे कौशल्य विकासाकरिता बाह्य़रुग्ण विभाग आणि आंतरुग्ण विभागात सेवा देत असले तरी विविध विषयांतील वर्गात होणाऱ्या तासिकांना गैरहजर राहत आहेत. या विद्यार्थ्यांचे वर्ग घेण्याकरिता प्रशासनाने महाविद्यालयात ८ वेगवेगळ्या सभागृहांची व्यवस्था केली आहे. या सुधारणेनंतर वर्गातील विद्यार्थ्यांची हजेरी वाढणार काय? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

 

‘‘विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वृिद्धगत व्हावा म्हणून त्यांनी नियमितपणे वर्ग करणे आवश्यक आहे. सध्या त्यांची हजेरी कमी असल्याने ती वाढवण्यासाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक यंत्र लावण्यात येईल. गैरहजर विद्यार्थ्यांना जाब विचारला जाईल.’’

डॉ. अभिमन्यू निसवाडे,

अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.

First Published on January 10, 2018 3:17 am

Web Title: cctv cameras in medical to increase student attendance