पाचपावलीतील घटनेने मुद्दा पुन्हा ऐरणीवर

नागपूर : स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून प्रत्येक नागरिकांची हालचाल त्यात टिपण्यात येते. पण, रात्रीच्या अंधारात हेच सीसीटीव्ही कॅमेरे कूचकामी ठरत असून अपघात व विविध गुन्ह्य़ांत वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे क्रमांक समोर येण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावर गुन्ह्य़ांच्या तपासात अडचणी  येत असल्याची बाब पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत काही दिवसांपूर्वी घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सेफ अ‍ॅण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ५२० कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी सव्‍‌र्हिलन्सचा प्रकल्प उभारला गेला. या प्रकल्पांतर्गत चारचाकी वाहने अन् स्मार्ट सिटी स्ट्रीटवरील दिवेही संचालित करण्यात येत आहेत.  शहरातील सध्या सातशे चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले. आतापर्यंत शहरातील १०१४  कि.मी. परिसर कॅमेऱ्याच्या टप्प्यात आला आहे. पण, रात्रीच्या अंधारात वाहनांचा क्रमांक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंद होत नाही. शिवाय चालत्या वाहनांचा क्रमांक स्पष्टपणे दिसत नसल्याची बाब अनेकदा समोर आली. ६ जूनला निर्मलसिंग गुरुमलसिंग गंजेल (३२) रा. सिद्धार्थनगर, टेका हे पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा क्रमांक पुलाजवळून दुचाकीने घरी जात होते. त्यावेळी अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी पळवली. घटनास्थळापासून जवळच  सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. पण, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर सोनसाखळी पळवणाऱ्याच्या दुचाकीच्या लाईटचा प्रकाश पडल्याने दुचाकीचा क्रमांक नोंदवला गेला नाही.

दुचाकीचा क्रमांक पोलिसांना मिळाला असता तर चोरटय़ाचा माग काढण्यात पोलिसांना यश आले असते. पण, अद्यापही पोलिसांना तो सोनसाखळी चोर पकडण्यात यश आले नाही. त्यामुळे चौकाचौकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे मत पोलीस विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रात्रीच्या सुमारास काही ठिकाणी पथदिव्यांचा प्रकाश व्यवस्थित नसेल व समोरच्या वाहनाचा प्रकाश अधिक असेल तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये वाहन क्रमांक नोंद होत नाही. पण, हा प्रकार क्वचितच घडतो. पोलिसांकडून कोणत्या परिसरात अशा घटना घडतात हे लक्षात आणून दिल्यानंतर त्या त्रूटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

– मनीष सोनी, जनसंपर्क अधिकारी, स्मार्ट सिटी प्रकल्प.