पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

नागरिकांचे रक्षण करण्याबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याचे काम अधिक जलदगतीने व्हावे, यासाठी आधुनिकीकरणावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूर शहरामध्ये स्मार्ट सीटी प्रोजेक्ट अंतर्गत ५ हजारापेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

नागपूर स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही सव्‍‌र्हेलन्सचा आढावा दीक्षितनगर येथील पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक ५ मध्ये  घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार, परशुराम कार्यकर्ते, पोलीस निरीक्षक पराग पोटे, भरत ठाकरे, बापू ढेरे यांची उपस्थिती होती. नागरिकांचे व त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करणे शासनाचे काम आहे, परंतु एक हजार नागरिकांमागे एक पोलीस कार्यरत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. या पाश्र्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरतो. नागपूर शहर परिमंडळ क्रमांक ५ अंतर्गत ४२८ कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच कामठी व इतर संवेदनशील ठिकाणी ६९ जागी सव्‍‌र्हेलन्स स्थापन करण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शहरात स्मार्ट सिटी तयार कारण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ६० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्यात येईल. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्यांना पोलीस कशी वागणूक देतात, यावर सुद्धा सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येईल.

प्रत्येक झोनमघ्ये कार्यरत असलेल्या पोलिसांना लवकरच स्मार्ट फोन देण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे बावनकुळे  म्हणाले.